

सुनील सकटे
कोल्हापूर : एकीकडे निधी नाही म्हणून प्रकल्प रखडल्याचे चित्र असताना दुसरीकड हजारो कोटींचा निधी असूनही केवळ भूसंपादनाअभावी रस्ता विस्तारीकरणास ‘खो’ बसला आहे. कोल्हापूर-सांगली महामार्ग दुरुस्तीचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे.
राष्ट्रीय रत्नागिरी-नागपूर महामार्गातील कोल्हापूर-सांगली या 35 किलोमीटर रस्त्याची सध्या अक्षरश: चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, हातकणंगले येथे अर्धवट स्थितीत रेंगाळलेला उड्डाणपूल अपघातास निमंत्रण देत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची स्थानिकांसह वाहनधारकांतून मागणी होत आहे. कोल्हापूर-सांगली रस्त्याचा प्रश्न 2012 पासून प्रलंबित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चोकाक ते उदगाव-अंकली या रस्त्याच्या कामासाठी 35 किलोमीटरच्या मार्गासाठी एक हजार 142 कोटींचा निधी मंजूर केला आहे. एवढेच नाही तर हा निधी एनएचआयच्या स्थानिक कार्यालयास उपलब्धही झाला आहे.
810 कोटींचा निधी महामार्गाच्या विस्तारीकरण, रुंदीकरणासाठी असून 300 कोटी रुपये भूसंपादनासाठी तरतूद केली आहे. या कामासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र काही तांत्रिक कारणाने निविदा रद्द करण्यात आली. यासाठीचा प्रस्ताव एनएचआयच्या मुख्यालयात पाठविण्यात आला आहे. एकीकडे निधी आहे. पण जमीन ताब्यात नसल्याने काम करता येत नाही अशी अवस्था झाली आहे. या प्रलंबीत प्रश्नाकडे लक्ष देण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याची टीका वाहनधारकांतून होत आहे.