कोल्हापूर : समितीने ‘अलमट्टी’त शोधावीत महापुराची कारणे!
सुनील कदम
कोल्हापूर : कोल्हापूर - सांगली जिल्ह्यांतील महापुराची कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी जागतिक बँकेचे पथक या भागात दाखल झाले आहे. पण या पथकाने सर्वप्रथम महापुराची कारणे कर्नाटकातील अलमट्टी धरणात शोधण्याची गरज आहे. पंचगंगा नदीचे खोलीकरण-रुंदीकरण तर आवश्यकच आहे; पण त्याच्या बरोबरीने कोल्हापुरात पूर संरक्षक भिंत बांधण्याचीही आवश्यकता आहे.
महापुराचा तीनवेळा प्रत्यय!
सुरुवातीला अलमट्टी धरणाची उंची 500 मीटर होती, त्यावेळीही काहीवेळा अतिवृष्टी झाली होती; पण कधी कोल्हापूर-सांगलीला जीवघेण्या महापुराचा तडाखा बसलेला नव्हता. त्यानंतर अलमट्टीची उंची 505 मीटर आणि नंतर 512 मीटर करण्यात आली. पण त्यावेळीही कधी महापूर जाणवला नाही; पण 2005 साली अलमट्टी धरणाची उंची 518 मीटर करण्यात आली आणि नेमक्या त्याच वर्षी कोल्हापूर-सांगलीला जीवघेण्या महापुराचा तडाखा बसला. त्यावेळी पहिल्यांदाच या भागातील लोकांच्या मनात अलमट्टी आणि इथला महापूर याबद्दल शंकेची पाल चुकचुकली; पण त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. 2019 आणि 2021 साली आलेल्या महापुराने अलमट्टी आणि महापूर यांचा परस्परसंबंध अधोरेखित केला आहे.
अजूनही संशोधनच!
2005 साली कर्नाटकातील अलमट्टी धरणाचे बांधकाम पूर्ण होऊन पहिल्यांदाच हे धरण भरले आणि त्याचवेळी कृष्णा-वारणा आणि पंचगंगा नद्यांना या शतकातील सर्वात भयंकर महापूर आला. अलमट्टी धरणातील बॅकवॉटरमुळे हा महापूर आला, असे त्या दिवसापासूनच राज्यातील, देशातील आणि जगभरातील काही जलतज्ज्ञ ठासून सांगत आहेत. त्यानंतर काही समित्या आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी अलमट्टी आणि महापुराच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करून इथल्या महापुराला अलमट्टीचे बॅकवॉटरच कारणीभूत असल्याचे पुराव्यानिशी सांगितले आहे. 2005, 2019 आणि 2021 च्या महापुराने वारंवार यावर शिक्कामोर्तब केलेले आहे; पण याबाबतीत अजूनही आपल्या राज्य शासनाचे संशोधनच सुरू आहे.
जलसंपदाचा पोरखेळ!
कोल्हापूर शहराचा सुधारित विकास आराखडा 1999 साली मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार पूररेषा (रेड लाईन) आणि पूर नियंत्रण रेषा (ब्ल्यू लाईन) निश्चित करण्यात आलेली आहे. या दोन रेषांमधील क्षेत्र हे बांधकाम निषिद्ध क्षेत्र समजून महापालिकेनेही बांधकाम परवाने दिलेले आहेत. असे असताना 2019 च्या महापुरानंतर जलसंपदा विभागाने नव्याने पूररेषा आणि पूर नियंत्रण रेषा निश्चित करताना या दोन्ही रेषा जवळपास 150 मीटरने आत ढकलल्या आहेत. असे केल्याने कोल्हापूर शहरातील जवळपास निम्मी नागरी वस्ती ही पूरप्रवण क्षेत्रात लोटण्याचा धोका आहे; पण हे करीत असताना जलसंपदा विभागाने या भागातील महापुराचा अभ्यास केलेला दिसत नाही. ज्या नागरी वस्त्या मागील 100-150 वर्षांत कधी पाण्याखाली गेल्या नव्हत्या त्या अचानक पाण्याखाली जाण्याची कारणे अलमट्टीत न शोधता ती इथेच शोधण्याचा जलसंपदाचा हा निर्णय आततायी स्वरूपाचा आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे.
प्रथमोपचार आवश्यक!
राज्य शासनाने आता जागतिक बँकेच्या सहकार्याने महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याची योजना हाती घेतली आहे. त्याची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचे पथकही इथे दाखल झालेले आहे; पण या सगळ्या सोपस्कारापूर्वी काही प्रथमोपचार करण्याची गरज आहे. सर्वात आधी पंचगंगा-कृष्णा-वारणा या नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण आवश्यक आहे. कारण, गेल्या कित्येक वर्षांपासून या नद्यांची पात्रे वेगवेगळ्या कारणांनी भराव पडून उंचावली गेली आहेत. दुसरे म्हणजे, ज्याप्रमाणे सांगली शहरात पूर संरक्षक भिंतीचे काम झाले आहे, तशाच पद्धतीची पूर संरक्षक भिंत कोल्हापुरातही होण्याची आवश्यकता आहे. महापुराचे पाणी अन्यत्र वळविण्यापूर्वी प्राधान्यक्रमाने ही कामे मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.
नद्यांचे प्रवाह खंडित होण्याचा धोका!
अलमट्टी धरणाची उंची सध्या 519 मीटर आहे. नेमकी तेवढीच आपल्या राजापूर बंधार्याची तळपातळी आहे. अलमट्टी भरले की त्याचे बॅकवॉटर राजापूर बंधार्याला येऊन टेकते. या बंधार्याची उंची फक्त 13 फूट आहे. अलमट्टीची उंची 524 मीटर वाढवली की त्याच्या बॅकवॉटरमध्ये राजापूर बंधारा बुडून बंधार्यावर 10 फुटांहून अधिक पाणी चढेल. साहजिकच पंचगंगा-कृष्णा-वारणा नद्यांचा प्रवाहही खंडीत होऊन या नद्यांचे बॅकवॉटर आजूबाजूच्या गावांमध्ये व नागरी वस्तीत शिरल्याशिवाय राहणार नाही. या बॅकवॉटरमध्ये त्या भागातील दोन्ही बाजूच्या हजारो हेक्टर सुपीक जमिनी, गावे आणि नदीकाठावरील नागरी वस्त्या कायमच्या बुडून जातील.

