

कोल्हापूर ः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (एमआरडीपी) राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने तब्बल 3 हजार 200 कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार असून त्यापैकी 2 हजार 240 कोटी रुपये जागतिक बँकेकडून तर 960 कोटी रुपये राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा ‘मित्र’ संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पूरप्रवण भागातील नागरिकांना दिलासा देणे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक मजबूत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रकल्पाअंतर्गत आपत्ती व्यवस्थापनासाठी खाजगी भांडवलाच्या माध्यमातून वित्तपुरवठा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. जागतिक बँकेकडून 165 कोटींचा अतिरिक्त निधीही मिळणार आहे. या निधीतून आपत्तीग््रास्त नागरिकांना गृहकर्जावर सवलती, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना कर्जसवलत तसेच विशेष विमा संरक्षण दिले जाणार आहे.
इचलकरंजीला 450 कोटींचा निधी
पंचगंगा, कृष्णा व वारणा नद्यांमुळे दरवर्षी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील गावांना मोठा फटका बसतो. विशेषत: इचलकरंजी शहराला याची जास्त झळ बसत होती. या प्रकल्पांतर्गत इचलकरंजी शहरासाठी तब्बल 450 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे उपलब्ध झाला. यासाठी खा. धैर्यशील माने यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले.