

कोल्हापूर : महाराष्ट्राला न जुमानता कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण या धरणाची उंची वाढल्यास पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील शेकडो गावांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कर्नाटकचे हे प्रयत्न उधळून लावायला हवेत.
सध्या अलमट्टी धरणाची उंची केवळ 519 मीटर असताना हे धरण भरले की, या धरणाच्या बॅकवॉटरमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजतो. पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील अनेक गावे आणि नागरी वस्त्या पाण्याखाली जातात. कोल्हापूर आणि सांगली ही शहरे निम्मी पाण्याखाली जातात. अशा परिस्थितीत या धरणाची उंची 524 मीटर म्हणजे आणखी 17 फुटांनी वाढवली तर किती भयानक स्थिती निर्माण होईल त्याची कल्पनाच करता येत नाही.
या धरणाची उंची 17 फुटांनी वाढवल्यामुळे आज कोल्हापूर, सांगलीपर्यंत येत असलेला अलमट्टीच्या बॅकवॉटरचा फुगवटा थेट कराड शहरापर्यंत जाऊन भिडेल. धरणातील पाण्याच्या पातळीत आणि बॅकवाटरच्या पातळीतही 17 फुटांची वाढ झाल्यामुळे नदीकाठची आणि या बॅकवॉटरच्या कक्षेतील शेकडो गावांपैकी काही अंशत: तर काही पूर्णत: पाण्याखाली जातील. याशिवाय नदीकाठची अत्यंत सुपीक अशी लाखो हेक्टर जमीन कायमस्वरूपी या बॅकवॉटरखाली जाणार आहे. लाखो लोक देशोधडीला लागणार आहेत. पाण्याखाली जाणार्या या गावांच्या पुनर्वसनाची डोंगराएवढी समस्या निर्माण होणार आहे.
पूर्वी अलमट्टीची उंची 512 मीटर होती, ती 2005 साली 519 मीटरपर्यंत वाढविली गेली. अलमट्टीची उंची वाढवल्यानंतर लगेचच त्याच वर्षी आलेल्या महापुराने या धरणातील बॅकवॉटरमुळे होणार्या वाताहतीची कल्पना आली होती. 2019 आणि 2021 सालातील महापुराने अलमट्टी आणि महापुराच्या संबंधावर जणू काही शिक्कामोर्तबच केले आहे. असे असताना कर्नाटक सरकारने उत्तर कर्नाटकातील लोकांच्या कल्याणासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लोकांच्या संसारावर निखारे ठेवायची सिद्धता सुरू केल्याचे दिसत आहे.
सध्या अलमट्टी धरणाची असलेली 519 मीटर हीच उंची पश्चिम महाराष्ट्रातील महापुराला कारणीभूत ठरत आहे. तीच उंची आणखी पाच मीटरने वाढली तर महापुराची तीव्रतासुद्धा त्याच पटीत वाढणार आहे. अलमट्टीतून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याशिवाय महापूर ओसरत नाही, हा प्रत्येक महापुरावेळी घेतलेला अनुभव आहे. पण तज्ज्ञांच्या मते अशी स्थिती उद्भवल्यास अलमट्टीतून 30 लाख क्युसेकने विसर्ग करावा लागेल. अलमट्टी धरणाची सध्याची सर्वाधिक विसर्ग क्षमता 10 लाख क्युसेक आहे. ही क्षमता विचारात घेता महापूर ओसरायला किमान एक महिना लागेल. या कालावधीत हे बॅकवॉटर शिरलेल्या गावांची वाट लागल्याशिवाय राहणार आहे काय?
एकूणच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यामुळे पश्चिम महाराष्ट्रावर नांगरच फिरण्याचा धोका आहे. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्राला जलप्रलयात लोटणारा आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. (क्रमश:)
अलमट्टी धरणाची उंची सध्या 519 मीटर आहे. नेमकी तेवढीच आपल्या राजापूर बंधार्याची तळपातळी आहे. अलमट्टी भरले की त्याचे बॅकवॉटर राजापूर बंधार्याला येऊन टेकते. या बंधार्याची उंची फक्त 13 फूट आहे. अलमट्टीची उंची 524 मीटर वाढवली तर त्याच्या बॅकवॉटरमध्ये राजापूर बंधारा बुडून बंधार्यावर 10 फुटांहून अधिक पाणी चढेल. साहजिकच पंचगंगा-कृष्णा-वारणा नद्यांचा प्रवाहही खंडित होऊन या नद्यांचे बॅकवॉटर आजूबाजूच्या गावांमध्ये व नागरी वस्तीत शिरल्याशिवाय राहणार नाही. या बॅकवॉटरमध्ये त्या भागातील दोन्ही बाजूच्या हजारो हेक्टर सुपीक जमिनी, गावे आणि नदीकाठावरील नागरी वस्त्या कायमच्या बुडून जातील.