

कोल्हापूर : काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांचे फ्रंट डोअर राजकारण कोल्हापूरकरांनी कधीच संपविले आहे. त्यामुळे पाटील यांना आता बॅक डोअर राजकारणाशिवाय पर्याय शिल्लक नाही, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, आ. पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेतील सत्ता आणि महापौर निवडीविषयी काँग्रेस-शिवसेना आघाडीसंदर्भात टाकलेल्या गुगलीवर आ. क्षीरसागर यांनी स्पष्टोक्ती दिली.
दरम्यान, महापौरपदासाठी काँग्रेससोबत शिवसेना कधीही आघाडी करणार नाही. कोल्हापूर महापालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार असून अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर होणारच. महापौरपदासह सर्वच पदांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतले जातील. सतेज पाटील हे निगेटीव्ह नरेटीव्हचा बादशहा असल्याने वाट्टेल ते अफवा पेरतात असेही आ. क्षीरसागर म्हणाले.
कोल्हापूर शहरात शिवसेनेला चांगले यश मिळाले. विधानसभेचाच ट्रेंड महापालिका निवडणुकीत दिसला. कोल्हापूर गावठाणातील पेठा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. कसबा बावड्यात मात्र काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचे आणि बूथ बळकविण्याचे प्रकार झाल्याचे तेथील महायुतीच्या उमेदवारांनी सांगितले. महायुतींतर्गत 26 जागा जिंकून भाजप मोठा भाऊ ठरला आहे. परंतु, शिवसेनेलाही चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार शिवसेनेला महापौरपद मिळेल. राष्ट्रवादीलाही सत्तेत पदे मिळतील, असेही आ. क्षीरसागर म्हणाले.