कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा कोल्हापूरवासीयांनी यंदाही कायम ठेवत या उपक्रमाला साथ दिली. कृत्रिम कुंडांत गणेशमूर्ती विसर्जनाला यावर्षीही नागरिकांनी प्रतिसाद दिला. मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत शहरात सुमारे 40 हजारांवर गणेशमूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. यामुळे पर्यावरणपूरक विसर्जन झालेल्या मूर्तींची संख्या 55 हजारांवर जाईल, अशी शक्यता आहे.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने मूर्ती दान केल्या. शहरभरात महापालिकेने 160 गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य कुंड ठिकठिकाणी ठेवले होते. प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी 4 प्रमाणे 2 शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त केले होते. निर्माल्य गोळा करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने 13 आरोग्य निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली कर्मचारी कार्यरत होते. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त कपिल जगताप, आशुतोष कंकाळ, सहा. आयुक्त कृष्णा पाटील, संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जलअभियंता हर्षजित घाटगे, समीर व—ाघ्याबंरे, अमित दळवी आदींसह अधिकारी ठिकठिकाणी कार्यरत होते.
घरगुती गौरी-गणपती विसर्जनाकरिता महापालिकेचे सुमारे 2,500 कर्मचारी कार्यरत होते. शहरातही विविध ठिकाणी नियुक्त्या केल्या आहेत. गणेशमूर्ती संकलनासाठी 205 टेम्पो, 480 हमाल, 7 जेसीबी, 7 डंपर, 8 ट्रॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बूम, 5 अॅम्ब्युलन्स, 5 साधे तराफे व 10 फ्लोटिंगचे तराफे, यावर्षी पहिल्यांदाच 1 क्रेन अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.
संकलित करण्यात आलेले निर्माल्य खत तयार करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेशन हॉस्पिटल येथे स्वतंत्र खड्डा करून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. अवनि, एकटी, वसुंधरा व इतर सेवाभावी संस्थांच्या मदतीने हे काम केले जाणार आहे.