शिरोली एमआयडीसी : कत्तलीसाठी पेठनाका येथून कर्नाटक राज्यात संकेश्वर येथे कोकण गिडडा व खिलारी जातीचे अकरा बैल घेवून जाणारा ट्रक शिरोली पोलिसांनी सांगली फाटा येथे पकडला. ते बैल कराड येथील गो शाळेत पाठवण्यात आले आहेत. आरोपीवर शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी ऋषिकेश शांताराम वारे (वय २४ रा. पेठनाका ता. वाळवा, जि. सांगली) हा कोकण गिडडा आणि खिलारी जातीचे ११ बैल ट्रकमधून कर्नाटक येथील संकेश्वर याठिकाणी कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मानद प्राणी कल्याण अधिकारी आशिष कमलाकांत बारीक यांना मिळाली होती. शिरोली पोलिसांच्या मदतीने त्यांनी ट्रकचा पाठलाग करून सांगली फाटा येथे ट्रक आडवून ट्रकची पहाणी केली असता ट्रकमध्ये अकरा बैल आढळून आले. ट्रक घेऊन जाणाऱ्या वारे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हे बैल संकेश्वर येथे कत्तलखान्यात घेवून जात असल्याचे कबूल केले. पोलिसांनी सर्व बैल ताब्यात घेवून त्याना कराड येथील गो शाळेत पाठवले. या गुन्ह्याची नोंद शिरोली पोलिसांत झाली आहे.