

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. बुधवारी शहरात रिपरिप, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर होता. हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला गुरुवारी (दि. 24) रेड अलर्ट दिला आहे. यामुळे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. रात्री 9 वाजता पातळी 17 फूट 3 इंचांवर होती.
शहरात मंगळवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. बुधवारी दिवसभर अधूनमधून हलक्या व मध्यम सरी कोसळत होत्या. दुपारी शहरात मध्यम पाऊस झाला. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. छत्री, रेनकोट, जॅकेट घालून फिरताना दिसत होते.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावासाचा जोर होता. गेल्या 24 तासांत गगनबावडा येथे मुसळधार पाऊस झाला. त्याशिवाय भुदरगड तालुक्यातील कडगाव, शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथेही जोरदार पाऊस झाला. धरण क्षेत्रातील पावसाचा जोरही वाढला आहे. कुंभी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. तसेच राधानगरी, वारणा, कासारी, कडवी, पाटगाव, चित्री, घटप्रभा, धामणी, कोदे या धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2 घरांची अंशतः पडझड झाल्याने 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पाणी आल्याने 1 राज्य व दोन जिल्हा मार्ग अद्याप बंद असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गांनी सुरू आहे.
राधानगरी धरण 94 टक्के भरले असून धरणातून 1500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तुळशी 79 टक्के, वारणा 81, दूधगंगा 75, कासारी 75, कडवी 99, कुंभी 81, पाटगाव 97, चिकोत्रा 91, जांबरे 98 टक्के भरले. धामणी, सर्फनाला, आंबेओहोळ, घटप्रभा, जंगमहट्टी, चित्री, चिकोत्रा, कोदे हे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.
पंचगंगा नदीची पाणी पातळी मंगळवारी रात्री 16 फूट 10 इंचांवर होती. बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत यामध्ये एक इंचाची घट झाली. यानंतर दुपारी दोनपर्यंत पातळी 16 फूट 9 इंचांवर स्थिर होती. सायंकाळनंतर यामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. रात्री 9 वाजता पाणी पातळी 17 फूट 3 इंचांवर स्थिरावली होती. अद्याप 7 बंधारे पाण्याखाली आहेत.