

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि तीन नगर पंचायतींसाठी मंगळवारी ईर्ष्येने सुमारे सरासरी 78.87 टक्के मतदान झाले. राजकीय पक्ष, नेत्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा, सर्वच ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीत झालेली बिघाडी, त्यातून राज्यातील मित्रांतच, स्थानिक पातळीवर झालेला जोरदार संघर्ष, टोकाचे आरोप-प्रत्यारोप आणि त्यातून निर्माण झालेली चुरस प्रत्येक मतदान केंद्रावर दिसली. यामुळे बहुतांशी सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
काही केंद्रात सायंकाळनंतरही रांगा होत्या. किरकोळ वादावादी, लाठीमाराचे प्रसंग, ईव्हीएम बदलाचे प्रकार वगळता मतदान सुरळीत झाले. नगराध्यक्ष आणि सदस्य पदाच्या एकूण 856 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मतदारांचा कौल कुणाला याचा फैसला मात्र तब्बल 18 दिवसांनंतर 21 डिसेंबर रोजी होणार आहे.
जिल्ह्यातील जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी, कागल, गडहिंग्लज, मुरगूड, वडगाव, पन्हाळा आणि मलकापूर या दहा नगर परिषदा आणि आजरा, चंदगड व हातकणंगले या तीन नगर पंचायतींसाठी मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह होता. अनेक मतदान केंद्रांवर प्रारंभीच रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत या पहिल्या चार तासांत सरासरी 28.12 टक्के मतदान झाले.
प्रत्येक मतदाराला नगराध्यक्षांसह तीन ते चार उमेदवारांना मतदान करावे लागत होते. यामुळे मतदाराला दोन-तीन मिनिटांचा कालावधी लागत होता. सर्वच केंद्रांवर सारखी परिस्थिती होती. यामुळे मतदारांच्या रांगा वाढत चालल्या होत्या. दुपारनंतर मात्र मतदारांची संख्या काहीशी कमी झाली, यामुळे मतदानाचा वेगही तुलनेने काहींसा कमी झाला. दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 45.90 टक्के इतकी झाली. दुपारी दीड ते साडेतीन वाजेपर्यंत मतदाराचा वेग पुन्हा काहीसा मंदावला. दुपारी साडेतीनपर्यंत 61.99 टक्के मतदान झाले. अखेरच्या दोन तासात उमेदवार, कार्यकर्त्यांची उर्वरित मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रचंड दमछाक सुरू होती. शिल्लक मतदारांशी संपर्क साधला जात होता, मतदानाला येण्यासाठी विनवणी केली जात होती. अखेरच्या दोन तासांत 16.88 टक्के मतदान झाले. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी सुमारे 78.87 टक्के मतदानाची नोंद झाली.
21 डिसेंबरला मतमोजणी
जिल्ह्यातील 13 नगरपालिकांमध्ये 13 नगराध्यक्ष पदाच्या 56 उमेदवारांसाठी व 263 नगरसेवकांमधील 8 बिनविरोध जागा वगळता 254 जागांवरील 800 उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. गडहिंग्लजमधील एका जागेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर सर्वच 255 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी एकत्रित 21 डिसेंबर रोजी होणार आहे.
वादावादी, लाठीमाराचे प्रसंग
गडहिंग्लजमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जनता दलाच्या स्वाती कोरी यांच्यात मतदान केंद्रांत जाण्यावरून शाब्दिक चकमक उडाली. कागलमध्ये एका मतदान केंद्रांवर ईव्हीएमवर मार्करची शाई लावल्याने उमेदवार आणि पोलिस यांच्यात वादावादी झाली. हुपरी आणि वडगावमध्ये वादावादी, सौम्य लाठीमाराचे प्रकार झाले. जयसिंगपुरात मतदानाच्या वेळेनंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मुरगूडमध्ये मशीनचा आवाज येत नसल्याने मतदार आणि अधिकारी यांच्यात वादावादी झाली. आजऱ्यातही किरकोळ बाचाबाचीचे प्रकार झाले. गडहिंग्लजमध्ये एका मतदान केंद्रांवर बोगस मतदान करणाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सोयी-सुविधा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्र आणि मतदारांसाठी किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विशेषतः महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी विशेष सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या.
पिंक आणि आदर्श मतदान केंद्रांची उभारणी
मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि विशेषतः महिलांसाठी सुरक्षित व आकर्षक मतदान अनुभव देण्यासाठी पिंक मतदान केंद्रे आणि आदर्श मतदान केंद्रे 13 ही ठिकाणी उभारली गेली. त्याला मतदारांनीही चांगला प्रतिसाद दिला.
प्रशासनाच्या नियोजनाने मतदान प्रक्रिया सुरळीत
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सहआयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मुतकेकर यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा, 3 नगरपंचायतींमधील निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियोजनातून निवडणूक प्रक्रिया सुरळीत झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या नियंत्रणाखाली व प्रत्येक ठिकाणी तैनात पोलीस अधिकारी, शिपाई यांच्या दक्षतेमुळे किरकोळ प्रकार वगळता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.