

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात जून ते ऑगस्ट या कालावधीत ३३ डेंग्यू आणि १७ चिकुनगुनिया रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापालिकेने पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये डेंग्यूची चाचणी व उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पावसाळी हंगामात डासांद्वारे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. नागरिकांनीही खबरदारी घेऊन घरासह परिसरात पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी.
महापालिकेच्या आरोग्य विभाग व आरोग्य निरीक्षकांमार्फत शहरात दररोज डेंग्यू प्रतिबंधक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणादरम्यान घरातील पाण्याचे साठे, कूलर, पाण्याच्या टाक्या, टाकाऊ भांडी, टायर, फुलदाण्या तसेच ओल्या कचऱ्याचे ढीग आदींची तपासणी करण्यात आली. डासोत्पत्तीची ठिकाणे आढळून आलेल्या ठिकाणी तातडीने औषध व कीटकनाशक फवारणी करण्यात आली. तसेच, संशयित भागांमध्ये धूर फवारणी आणि नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे.
नागरिकांनी ‘ड्राय डे’ पाळावा...
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळावा. घरातील पाण्याचे साठे, कूलर, पाण्याच्या टाक्या रिकाम्या करून स्वच्छ कराव्यात. घराच्या आजूबाजूला, टेरेसवर, टायर, नारळाच्या करवंट्या किंवा इतर वस्तूंमध्ये पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे आदी लक्षणे आढळल्यास नागरी आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.