

कोल्हापूर : शहरात पाऊस पुन्हा बरसू लागला आहे. शुक्रवारी दिवसभर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत पाटगाव, घटप्रभा, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. राधानगरी धरणाचा ३ व ६ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला असून धरणातून ४२५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अडीच फुटांची घट होऊन पातळी रात्री १२ वाजता ३० फूट ७ इंचावर स्थिरावली होती.
पावसाने शुक्रवारी पुन्हा कमबॅक केले. शहरात दिवसभर अधून मधून जोरदार तर काही काळ रिपरिप सुरू होती. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६.४ मि.मी. पाऊस झाला. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १३.३ मिमी पाऊस बरसला. हातकणंगले ३.२ मिमी, शिरोळ २.२, पन्हाळा ७.०, शाहूवाडी ८.१, राधानगरी १३, गगनबावडा १३.३, करवीर ५.२, कागल ४.६, गडहिंग्लज १.७, भुदरगड ५.९, आजरा ४.२, चंदगड येथे १६.५ मि.मी. पाऊस झाला.
३४ बंधारे पाण्याखाली; कडवी धरण भरले
पंचगंगा नदीची पाणी पातळी गुरुवारी रात्री १२ वाजता ३३ फूट २ इंचावर होती. शुक्रवारी दिवसभऱात २ फूट ८ इंचांची घट होऊन पातळीत रात्री ९ वाजता ३० फूट ६ इंचावर स्थिरावली होती. रात्री १२ वा. पातळीत पुन्हा वाढ होण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील कडवी मध्यम प्रकल्प सायंकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरला. वेदगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
‘राधानगरी’चे दोन दरवाजे खुले
राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून गुरुवारी रात्री ११.३२ वाजता सहा क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. शुक्रवारी सायंकाळी ४.वा.५ मि. वाजता तीन क्रमांकाचा असे दोन दरवाजे खुले असून यातून २,८५६ व वीजगृहातून १,४०० असा ४,२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे.
जुलैमधील मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरले. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत ५४ मि. मी. पावसाची नोंद झाली असून दिवसभरात ५८ मि. मी. पाऊस झाला. जूनपासून आजअखेर २८५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणी पातळी ३४७.४४ फूट असून पाणीसाठा ८३५०.५४ द.ल. घ. फूट इतका आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.