

कोल्हापूर : जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली. सरासरीच्या 106.6 टक्के पाऊस झाला. जूनमध्ये एकूण 362.9 मि.मी. इतका पाऊस होतो, या महिन्यात तो 387 मि.मी. इतका झाला. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाला आहे. गतवर्षी या महिन्यात केवळ 200.5 मि.मी. म्हणजे 55.6 टक्के इतकाच पाऊस झाला होता.
यावर्षीही पावसाने गतवर्षीचा पॅटर्न जवळपास कायम ठेवला आहे. यावर्षीही सर्वाधिक पावसाच्या तालुक्यांत जूनमध्ये कमी पाऊस झाला आहे. गगनबावडा, चंदगड आणि राधानगरी या जास्त पाऊस पडणार्या तालुक्यांत या महिन्यात पावसाने सरासरी गाठली नाही. राधानगरी तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यात सरासरीच्या 77.3 टक्के इतकाच पाऊस महिनाभरात झाला आहे. या ठिकाणी महिनाभरात 664.5 मि.मी. इतका पाऊस होतो, यावर्षी जूनमध्ये तो 513.4 मि.मी. इतका झाला आहे.
यावर्षी कागल तालुक्यात जून महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. कागल तालुक्यात सरासरी 127.1 मि.मी. पाऊस होतो, या महिन्यात तिथे 327.2 मि.मी. म्हणजेच सरासरीच्या तब्बल 257.4 टक्के इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील हा सर्वाधिक पाऊस आहे.
जिल्ह्यातील सहा तालुक्यांत जून महिन्यात सरासरीच्या दीडपट जादा पाऊस झाला आहे. करवीर (171.3), हातकणंगले (171.2), भुदरगड (161.8), आजरा (159.7), गडहिंग्लज (151.3) व पन्हाळा (150.1 टक्के) या तालुक्यांत सरासरीपेक्षा दीडपट पाऊस झाला आहे.