

कोल्हापूर : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचे कोल्हापूर शहरातही पडसाद उमटले. बिंदू चौक, दसरा चौकात निदर्शने झाली. याबाबतचे आंदोलन तीव्र करण्यासाठी रविवारी बैठक आयोजित केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे.
शनिवारी बिंदू चौकात विविध सामाजिक संघटना व युवकांच्या वतीने घोषणाबाजी करीत आंदोलन केले. निषेध सभेत लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाची मागणी करण्यात आली. २० जुलै रोजी शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून राजीव गांधी पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सतीशचंद्र कांबळे यांनी उपोषणाच्या लोकशाही परंपरेचा उल्लेख करत आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. दिलदार मुजावर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातून कार्यकर्त्यांचा गट दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती दिली. डॉ. बी. एम. हिर्डेकर, अभिषेक मिठारी, अतुल दिघे, मेघा पानसरे, प्रेमानंद घोडेराव, संदीप देसाई, सीमा पाटील, भरत रसाळे आदींनी मनोगते व्यक्त केली. सोनाली गजबर यांनी क्रांती कविता तर यश आंबोळे यांनी प्रेरणादायी गीत सादर केले. यावेळी जयंती कांबळे, निहाल शिपुरकर, राजेश वरक, रमेश वडणगेकर, इरशाद फरास, मिलिंद यादव, सुभाष वाणी, अनमोल कोठाडिया यांच्यासह नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शीतल पाटील, रसिया पडळकर यांनी केले. कॉ. उदय नारकर यांनी आभार मानले.
दडपशाहीची किंमत मोजावी लागेल
वांगचुक यांच्यावर कारवाई करत सरकारने दडपशाही केली. त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा देत महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात निदर्शने केली.
अनेक प्रश्नांवर सरकार गंभीर नाही. लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेली आंदोलने जर सरकार दडपणार असेल, तर येथे लोकशाही आहे की नाही, असा प्रश्न पडत आहे. संसदेवर दि.२० जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाला सरकार घाबरले, त्यामुळेच ही कारवाई केल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.
या आंदोलनात डॉ. अनिल माने, डी. जी. भास्कर, प्रमोद हुपरीकर, राजेंद्र कांबळे, सुरेश जत्राडकर एकनाथ कांबळे, तात्यासाहेब कांबळे, जी. बी. आंबपकर, विकास आयरेकर, नंदकुमार घोडके, आबासाहेब सोनवणे, संजय कुरणे आदी सहभागी झाले होते.
आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारचे षडयंत्र : आ. पाटील
वांगचुक यांच्यावर प्रकृतीचे कारण देत केलेली कारवाई ही आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारने रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी शनिवारी केला. 20 जुलै रोजी जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनापूर्वीच सरकारने न्यायालयाचा आदेश मिळवून ही कारवाई केली. आंदोलनाचा मूळ मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा प्रकार म्हणजे देशात लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही सुरू झाली आहे, असाच असल्याचाही आरोप त्यांनी केला.
२३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारला ‘नीट’ परीक्षा सुरळीत घेता येत नसेल, तर ते देश कसा चालवणार? असा सवाल करत सरकारने चूक मान्य केली असताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. राज्य सरकारच्या शिक्षण विभागातील मान्यता आणि बदल्यांसाठी कथित ‘दरपत्रका’वरून त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली.
कोल्हापूर सिटीझन्स फोरमची आज बैठक
नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच याबाबतच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापूर सिटीझन्स फोरमने बैठक आयोजित केली आहे. रविवारी दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता चित्रदुर्ग मठ, दसरा चौक येथे ही बैठक होणार आहे.