कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळाच; वाहतूक धोकादायक

Kolhapur Ratnagiri Highway | महामार्ग अधिकाऱ्यांचे दुरूस्तीकडे दुर्लक्ष
Kolhapur Ratnagiri highway,
कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गाची दुरवस्था झाल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

प्रयाग चिखली; पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे आणि पुरामुळे खचलेला रस्ता निसरड्या असुरक्षित साईड पट्ट्या, कोणत्याही क्षणी कोसळतील असे जीर्ण वृक्ष, रस्त्यात पडलेले खड्डे, आणि दुरुस्ती म्हणून निकृष्ट आणि चुकीच्या पद्धतीने केलेली मलमपट्टी या सर्वांचा परिणाम म्हणजे कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील प्रवास धोकादायक आणि जणू मृत्यूचा सापळाच बनला असल्याचे चित्र आहे. अशी स्थिती असताना देखील नॅशनल हायवेचे अधिकारी अत्यंत जबाबदारपणे वागत असल्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. (Kolhapur Ratnagiri Highway)

महामार्गाची चुकीच्या पद्धतीने मलमपट्टी

कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर सध्या प्रचंड रहदारी वाढलेले आहे. त्या तुलनेत रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. शिवाय सध्या रस्त्यामध्ये अनेक लहान मोठे खड्डे पडले आहेत. पुरामुळे रस्ता खचलेला आहे. तसेच साईट पट्ट्या पुरामुळे वाहून गेलेल्या आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली अत्यंत चुकीच्या पद्धतीने मलमपट्टी केलेली आहे. पुरामुळे साईट पट्ट्यावरील मुरूम वाहून गेला आहे, त्याची तात्पुरती दुरुस्ती अत्यंत निकृष्ट पद्धतीने व बेजबाबदारपणे केल्यामुळे प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यामुळे साईट पट्ट्यांवर गवत वाढलेले आहे. अनेक जीर्ण वृक्ष कोसळण्याच्या स्थितीत धोकादायक आहेत. शिवाजी पुलापासून आंबेवाडीपर्यंत अनेक विक्रेत्यांनी व हॉटेल व्यवसायिकांनी रस्त्याच्या साईट पट्ट्यांवर दुकानाचे फलक लावून अतिक्रमण केल्याचा धोकाही उद्भवत आहे. साईड पट्ट्यांवर दुरुस्तीच्या नावाखाली मोठमोठे दगड टाकण्यात आलेले आहेत. तर काही ठिकाणी साईट पट्ट्या वर माती टाकल्यामुळे साईड पट्ट्या निसरड्या बनल्या आहेत. (Kolhapur Ratnagiri Highway)

तर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे. आंबेवाडी परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनी आपला ओला- सुका कचरा रस्त्याच्या बाजूला टाकत असल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे. शिवाय कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या बाजूला पडलेले आहेत. एकंदर हा रस्ता म्हणजे प्रवाशांना मृत्यूचा सापळाच वाटत आहे. नॅशनल हायवे विभागाने या रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी होत आहे.

फाटे नव्हे... यमदूत फाटे

शिवाजी पुल ते कोतोली फाटा दरम्यान या मार्गावरील आठ ठिकाणी वेगवेगळ्या गावांचे फाटे आहेत. या फाट्यांच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. शिवाय रस्त्यावरील पट्टे दिसत नाहीत. त्यामुळे फाट्यांच्या ठिकाणी मोठे अपघात घडत आहेत.

तो तर जीवघेणा खड्डा...

ऑगस्टमध्ये आलेल्या पुराच्या काळात आंबेवाडी जवळील रेडेडोह परिसरात मोहरीच्या ठिकाणी साईट पट्ट्यांवर सुमारे दहा फूट उंचीचा खड्डा पडलेला आहे. प्रवाशांना हा खड्डा लक्षात येत नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. ही बाब वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन देखील अधिकारी दाद देत नसल्याचे प्रवासी सयाजी पाटील (रा. रजपुतवाडी) यांनी सांगितले.

दुरुस्ती म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर ...

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थितरित्या झालेली नाही. वेळोवेळी जी दुरुस्ती होते. ती तात्पुरती आणि तितकीच निकृष्ट पद्धतीने होत आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याची प्रतिक्रिया रजपुतवाडीच्या ग्राम पंचायत सदस्य मंदा बाबासाहेब पाटील यांनी दिली.

Kolhapur Ratnagiri highway,
Navaratri 2024 | कोल्हापूर- भाविक लाखांवर अन् अवघे २२९ बॅग लॉकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news