

कोल्हापूर : राज्यातील रास्त भाव दुकानांत ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरण करताना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गंभीर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या तांत्रिक त्रुटींमुळे संपूर्ण धान्य वितरण प्रक्रिया पूर्णपणे कोलमडून पडली आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ७) जिल्ह्यातील सर्व दुकाने एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा रास्त भाव रेशन दुकानदार संघटनेने घेतला आहे.
ई-पॉस मशिनचा वेग कमी राहत असल्याने प्रत्येक व्यवहारासाठी वेळ लागत आहे. यासह नेटवर्क आणि सर्व्हर व्यवस्थित काम करत नसल्याने अनेकवेळा धान्य वितरण पूर्णपणे ठप्प होत आहे. परिणामी, दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. फिंगरप्रिंट मॅच झाल्यानंतरही ऑथेंटिकेशन पूर्ण होत नाही. तसेच ओटीपी जनरेट न होणे, अशा तांत्रिक कारणांनी धान्य वितरणाची प्रक्रिया वारंवार ठप्प होत असून ग्राहकांना तासन् तास रेशन धान्य दुकानाबाहेर रांगेत उभे राहावे लागत आहे.