कोल्हापूर : राजारामपुरी येथील आगमन मिरवणुकीतही बहुतांशी मंडळांना मुख्य मार्गावर सहभागी होता यावे यासाठी मोठ्या मंडळांना २० मिनिटे तर लहान मंडळांना १५ मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीप्रमाणे आगमन मिरवणूक मार्गावर पाच ठिकाणी सिग्नल उभारण्याचा निर्णयही घेतला.
मंगळवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी राजारामपुरी येथील आगमन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक विकास जाधव, पोलिस निरीक्षक संतोष डोके, पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह महापालिका, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
राजारामपुरी येथील आगमन मिरवणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असते. या ठिकाणी जे होते तेच विसर्जन मिरवणुकीत होते. पोलिस प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीत जास्तीत जास्त मंडळांना सहभागी होता यावे यासाठी टायमर सिग्नल ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. आहे. याची चाचणी राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत होणार असून पाच ठिकाणी सिग्नल उभारण्यात येणार आहेत. जनता बझार चौक, तिसरी गल्ली, सातवी गल्ली, नववी गल्ली आणी आग्नेयमुखी मारुती मंदिर येथे हे सिग्नल उभारले जाणार आहेत. विसर्जन मिरवणुकीप्रमाणे आगमन मिरवणुकीतही मंडळांना २० मिनिटांचा वेळ निश्चित केला आहे. मोठ्या मंडळांना २० तर छोट्या मंडळांना १५ मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. सिग्नल ग्रीन झाल्यानंतर मंडळांनी किमान २० ते २५ मीटर पुढे जाण्याचे नियोजन केले आहे. यामुळे मोठी मंडळे जागेवर न थांबता सर्व लहान-मोठ्या मंडळांना मुख्य मिरवणुकीत सहभागी होता येणार आहे.