कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी पावसाने उघडीप दिली. अधूनमधून पडणार्या हलक्या सरी वगळता दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत अत्यंत संथ वाढ सुरूच आहे. रात्रीत तीन फुटांनी वाढ झालेल्या पंचगंगेची पातळी दिवसभरात मात्र केवळ तीन इंचांनीच वाढली. जिल्ह्यात आणखी दोन बंधार्यांवर पाणी आले. यामुळे पाण्याखाली गेलेल्या बंधार्यांची संख्या 18 झाली. घटप्रभा धरण सकाळी भरले. दरम्यान घरांची भिंत कोसळून गडहिंग्लज येथे एका वृद्धेचा मृत्यू झाला.
शहरासह जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली. यामुळे शहरात सकाळपासूनच ऊन पडले होते. दोन-तीन दिवसांनंतर सूर्यदर्शन झाले. सकाळपासून अधूनमधून पावसाची श्रावणासारखी एकादी सर चार-पाच मिनिटे कोसळून पुन्हा ऊन पडत होते. दिवसभर पावसाचा जोर कमी झाला असला तरी सोमवारी रात्री दहा वाजल्यापासून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पंचगंगेच्या पाणी पातळीत तीन फुटांनी वाढ झाली. सकाळी आठ वाजता पाणी पातळी 25.11 फुटांवर होती. रात्री नऊ वाजता ती 26.2 फुटांवर गेली.
आणखी दोन बंधारे पाण्याखाली गेले. दूधगंगा नदीवरील कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली आणि शिरोळ तालुक्यातील दत्तवाड बंधार्यावर आज पाणी आले. यामुळे जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
चंदगड तालुक्यातील 1.56 टीएमसी क्षमतेचे घटप्रभा धरण मंगळवारी सकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. यामुळे धरणातील सांडव्यातून 700 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
जिल्ह्यात दिवसभर पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला होता; मात्र तत्पूर्वी मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत 17 पैकी 12 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. राधानगरी, तुळशी, वारणा, घटप्रभा, सर्फनाला आणि कोदे धरण परिसरात 100 मि.मी.पेक्षा जादा पाऊस झाला. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 17.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात 61.8 मि.मी. पाऊस झाला. राधानगरीत 33.1 मि.मी. पाऊस झाला.