

Kolhapur Rain Update
कोल्हापूर , पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार कोसळधारांमुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदीचे पाणी रविवारी (५ जुलै) पात्राबाहेर पडले आहे. गगनबावड्यासह जिल्ह्यातील तब्बल २७ ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, पंचगंगा नदीची पाणी पातळी ३३ फूट ३ इंचांवर पोहोचली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आणि सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील १४ महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यमार्ग २, प्रमुख जिल्हा मार्ग ३, ग्रामीण मार्ग ७, इतर जिल्हा मार्ग २ मार्ग बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मुसळधार पावसासोबतच सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरात एकूण ११ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दल आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर झाडे हटवून रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू आहे.
हवामान विभागाने (IMD) आज, ६ जुलै रोजी देखील कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे. पुढील २४ तासांत घाटमाथ्यासह सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंचगंगेची पाणी पातळी वेगाने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून हायअलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ओढ्याचे पाणी शिरल्याची घटना काल घडली आहे. विद्या मंदिर म्हाळुंगे शाळेच्या शेजारील ओढ्याला आलेले पुराचे पाणी आज थेट शाळेत शिरले. रविवार असल्याने शाळेला सुट्टी होती, मात्र आज शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत आल्यानंतर वर्गखोल्यांमध्ये चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. दोन वर्गखोल्यांमध्ये पाणी शिरल्याने मुलांना दुसऱ्या वर्गखोल्यांमध्ये बसविण्यात आले आहे.