

कोल्हापूर : जिल्ह्यातील ५४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यासह १८ मार्गांवरील थेट वाहतूक बंद झाली आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यातील अडीचशेवर गावांतील दळणवळण विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम दुध वाहतूक, व्यापार, शाळा, व्यवसाय आदींसह शेती कामासाठी दैनंदिन ये-जा करणाऱ्यांवर अधिक झाला आहे.
जिल्ह्यात पाच दिवसांपासून मुसळधार पावसाचे धूमशान सुरू होते. सर्वच नद्यांना पूर आला असून पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. यामुळे २९९ बंधाऱ्यांपैकी ५४ बंधारे सोमवारी सांयकाळी चार वाजेपर्यंत पाण्याखाली गेले होते. यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक बंदच आहे. परिसरातील गावांची कनेक्टिव्हिटी पूर्णपणे तुटली आहे. परिणामी दुसऱ्या मार्गाने काही अंतराचा फेरा मारून वाहनधारकांची ये-जा सुरू आहे. पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांसह जिल्ह्यातील ३ राज्य, ५ प्रमुख जिल्हा मार्ग, ८ ग्रामीण मार्ग आणि २ इतर जिल्हा मार्ग असे एकूण १८ मार्ग बाधित झाले आहेत. या मार्गावर काही ठिकाणी पाणी असल्याने त्यावरील वाहतूक बंद असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख १५ नद्यांपैकी १३ नद्यांवरील बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक दहा बंधारे वेदगंगा नदीवरील आहेत. वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, सुरुपली, गारगोटी, म्हसवे, करडवाडी व शेणगाव या बंधाऱ्यांवर पाणी आहे. पंचगंगा आणि कासारी नदीवरील प्रत्येकी सात बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. पंचगंगेवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ तर कासारी नदीवरील यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण, बाजार भोगाव, वालोली, कांटे व पेंडाखळे या बंधाऱ्यांचा समावेश आहे. घटप्रभा नदीवरील कानडी-सावर्डे, हिंडगाव, पिंपळी, भोगोली, अडकूर या पाच बंधाऱ्यांवर पाणी आले आहे.
भोगावती नदीवरील सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे हे तर कुंभी नदीवरील शेणवडे, कळे, सांगरुळ, मांडुकली, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सुळकूड, बाचणी, सिध्दनेर्ली असे प्रत्येकी चार बंधाऱ्यांवर पाणी आले आहे. कडवी नदीवरील कोपार्डे, सवते सावर्डे व सरूड पाटणे आणि वारणेवरील कोडोली, मांगले सावर्डे व खोची असे प्रत्येकी तीन बंधारे पाण्याखाली आहेत. तुळशी नदीवरील कसबा बीड व आरे, ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कोतेवाडी तर हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐनापूर असे प्रत्येकी दोन व धामणी नदीवरील सुळे असे एकूण ५४ बंधारे पाण्याखाली आहेत.