

कासारवाडी : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून नालेसफाईचे दावे करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र जोतिबा आणि पर्यटनस्थळ पन्हाळाला जोडणाऱ्या राज्य मार्गावर कासारवाडी, टोप येथील नारायण टेक येथे पहिल्याच पावसात तब्बल फुटभर पाणी साचले.
कासारवाडी आणि नारायण टेक भागातील नाले कचऱ्यामुळे पूर्णपणे तुंबल्याने ओसंडून वाहू लागल्याने संपूर्ण पाणी आणि कचरा रस्त्यावर आला आहे. या मार्गावरून अनेक विद्यार्थी, शिरोली एमआयडीसीतील कामगार तसेच भावीक, पर्यटक रोज हजारो वाहनांचा प्रवास असतो. वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
पावसाळा तोंडावर आला की, रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांची सफाई करणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्य असते. मात्र, यंदा या विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसते. कासारवाडी आणि नारायण टेक परिसरातील नाल्यांमध्ये साचलेला कचरा, गाळ आणि प्लास्टिक वेळेत न काढल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास जागाच उरली नाही. परिणामी, पावसाचे पाणी नाल्यांमधून रस्त्यावर वाहते.
पंचगंगा नदीला पूर आल्यास चिखली आंबेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्यास कासारवाडी मार्गे वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे येथील नालेसफाई करून येथे वाहतूक कोंड होऊ नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.
सुप्रिया वडिंगेकर, उपसरपंच, कासारवाडी