

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. 46 बंधार्यांवर पाणी आल्याने शंभराहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटल्याने नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.
गडहिंग्लज : सोमवारी रात्रीपासून गडहिंग्लजला पावसाचा जोर वाढला असून मंगळवारीदेखील संततधार सुरूच राहिली. यामुळे हिरण्यकेशीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ऐनापूर व निलजी बंधारे पाण्याखाली गेले. या दोन्हीवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
शिरोली दुमाला : पावसाचा जोर वाढल्याने करवीर पश्चिम भागातील आरे - सावरवाडी व बाचणी - हिरवडे दुमालादरम्यानच्या बंधार्यावर पाणी आले. कोल्हापूरला हळदीमार्गे जाण्यासाठी बाचणी - हिरवडे दुमालादरम्यानच्या बंधार्यावरून पर्यायी मार्ग होता; मात्र हे बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
गारगोटी : भुदरगड तालुक्यात वेदगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने गारगोटी, म्हसवे, निळपण व वाघापूर येथील कोल्हापूर पद्धतीचे चार बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पश्चिम भुदरगडमधून आजरा तालुक्याकडे होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सोहाळे धरणावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
इचलकरंजी : इचलकरंजी शहर व परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सायंकाळी पाणी पातळी 55 फुटांवर गेली होती. त्यामुळे पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाला पाणी घासत आहे. त्यामुळे रात्रीतून पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेने सायंकाळी जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.
कोडोली : चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून चिकुर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे.
मुरगूड : संततधार पावसामुळे मंगळवारी सायंकाळी मुरगूड-वाघापूर मार्गावर दत्त मंदिर परिसरात पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वेदगंगा नदीला पूर आला असून पुराचे पाणी नदीच्या दोन्ही बाजूला विखुरले आहे. सांयकाळी वेदगंगेचे पाणी वाघापूर पुलाच्या शेजारील रस्त्यावर आले. बाजूच्या दत्त मंदिराला पाण्याने वेढा दिला असून शहराच्या स्मशानभूमीपर्यंत चार ते पाच फूट पाणी आले आहे. मुरगूड - वाघापूर रस्ता बंद झाला आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसाने हाजगोळी येथील मराठी शाळेचे छत कोसळले. सुदैवाने आजच अतिवृष्टीमुळे शाळेला सुट्टी दिली होती. सोनारवाडी येथील संभाजी ठब्बे यांच्या घराची भिंत कोसळून 40 हजारांचे नुकसान झाले. हलकर्णी येथील गजानन पाटील यांच्या घराच्या पत्र्याच्या शेडवर झाड कोसळून 50 हजारांचे नुकसान झाले. हलकर्णी येथील उमाजी गायकवाड यांच्या घराची भिंत कोसळून 50 हजारांचे नुकसान झाले.
उत्तरेश्वर पेठेतील प्रसिद्ध महादेव मंदिराच्या दगडी तटबंदीचा काही भाग मंगळवारी पहाटे कोसळला. यामुळे उर्वरित तटबंदीही कोसळण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या तटबंदी शेजारी राहणार्या नागरिकांच्या घरांसह मंदिरालाही धोका निर्माण झाला आहे. मंदिराच्या शेजारी जुने पिंपळाचे झाड आहे. या झाडाची मुळे तटंबदीत घुसली आहेत. या मुळांमुळे तटबंदीचे बांधकाम आतून कमकुवत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने आणि मुळे घुसल्याने निर्माण झालेल्या जागेतून पाणी शिरून तटबंदी कमकुवत झाली आहे. मंगळवारी त्याचा काही भाग कोसळला.