कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ शहर हद्दवाढ कृती समितीने मंगळवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारात ‘बोंब मारो’ आंदोलन करत आंदोलकांनी महापालिका प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला. रिक्षांच्या माध्यमातून महापालिका इमारतीला घेराव घालण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता हद्दवाढीची प्रक्रिया होणार नसल्याने संतप्त झालेल्या कृती समितीच्या शिष्टमंडळाने तीव प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘हद्दवाढीच्या प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. याचवेळी आगामी महापालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन शहरवासीयांना करण्यात आले.
आर. के. पोवार म्हणाले, कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. यासाठी कृती समितीने महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा केला. सात गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला; मात्र त्यावर प्रशासन वा लोकप्रतिनिधींनी ठोस पाठपुरावा केला नाही. हद्दवाढीचे केवळ आश्वासन देऊन नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून लोकप्रतिनिधींना धडा शिकवा.
ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, हद्दवाढीच्या मुद्द्यावर मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांची चेष्टा केली आहे. प्रचारासाठी दारात येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला ‘शहर हद्दवाढीबाबत तुमचा नेमका अजेंडा काय?’ असा जाब विचारा. कायद्यानुसार 2030 पर्यंत शहराची हद्दवाढ होणे अशक्य असताना, काहीजण खोटी आश्वासने देत नागरिकांची दिशाभूल करत आहेत. अशा नेत्यांना निवडणुकीत योग्य उत्तर द्या.
दिलीप देसाई म्हणाले, हद्दवाढ न झाल्याने कोल्हापूर ‘कचरापूर’ बनले आहे. नागरी सुविधांच्या अभावामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून, याला शासन व हद्दवाढीकडे दुर्लक्ष करणारे नेते जबाबदार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत ‘नोटा’ला मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. हद्दवाढीचे केवळ गाजर दाखवून नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे.
बाबा पार्टे यांनी हद्दवाढीसाठी आता आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशारा दिला. आता हद्दवाढ अशक्य असताना खोटी आश्वासने देणाऱ्या नेत्यांना महापालिका निवडणुकीत भुईसपाट करा, असे आवाहन शहर हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाने केले. आंदोलनात अविनाश दिंडे, लहूजी शिंदे, रियाज कागदी, सादीक अत्तार, रवींद्र कांबळे, महादेव चव्हाण, रवींद्र संकपाळ, सुनील देसाई, सुनील पाटील, तुषार गुरव, राजवर्धन यादव, अविनाश माने आदी सहभागी झाले होते.