

कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी कपात केलेल्या डिबेंचरची रक्कम परत द्यावी, या मागणीसाठी गुरुवारी (दि. 16) ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती किसान मोर्चाचे भगवान काटे व प्रवीण पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांनी दिली.
गोकुळने दूध संस्थांची परवानगी न घेता डिबेंचर रक्कम 40 टक्क्यांप्रमाणे 74 कोटी रुपये कपात केले आहेत. गोकुळकडे 512 कोटींच्या ठेवी असल्याचे गोकुळच्या वतीने सांगण्यात येत असेल, तर दूध संस्थांच्या फरकातून डिबेंचर (कर्जरोखे) कपात करण्याची आवश्यकता का निर्माण झाली? यापूर्वी गोकुळ शिरगाव येथे संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनावेळी दि. 10 ऑक्टोबरपर्यंत सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी दिले होते. नंतर मात्र त्यांनी यू टर्न घेतला. गोकुळ अध्यक्ष परदेश दौऱ्यावर असल्याने प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
शासकीय विश्रामगृहापासून गुरुवारी सकाळी संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघेल. येथून ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. मोर्चात दूध संस्था व शेतकऱ्यांबरोबर संचालकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रमोद पाटील, बाबासो साळोखे, युवराज पाटील, सर्जेराव धनवडे, प्रताप पाटील उपस्थित होते.
कपात केलेली रक्कम चालू आर्थिक वर्षात परत करणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते; परंतु यातून संचालकांनी मार्ग काढावा. दूध उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम वाढवून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे. कपात केलेली रक्कम गोकुळने परत केली नाही, तर न्यायालयीन लढाई करण्यात येईल, असे काटे यांनी सांगितले.