

कोल्हापूर : गावठाणाबाहेरील मिळकतींनाही आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील शंभर गावांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वच गावांतील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. नगरपालिका क्षेत्रातील प्रॉपर्टी कार्ड नसणार्या मिळकतींनाही याचा लाभ होणार आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांत वस्ती वाढत आहे. यामुळे मूळ गावठाण कमी पडत आहे. यामुळेच अनेक गावांत गावठाणाबाहेर नागरी वस्ती वाढत चालली आहे. अशा वस्तीतील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड नसल्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशा मिळकतींनाही प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली होती.या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. गावठाणाबाहेरील मिळकतींसाठी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गावठाणाबाहेरील मिळकतींनाही प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. याकरता जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या हद्दीतील, विशेषतः नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपालिका हद्दीतील ज्या मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड नाही त्यांनाही मफनक्शाफफ योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या करिता लागणारा निधीही जिल्हा नियोजन समितीतून दिला जाणार आहे.
कोल्हापूर शहरातील ही प्रॉपर्टी कार्ड नसणार्या मिळकतींचाही प्रश्न मार्गी लागला आहे. नक्शा योजनेतून या सर्व मिळतील प्रॉपर्टी कार्ड तयार करून दिले जाणार आहे. त्याचे येत्या तीन-चार महिन्यात सुरू होणार आहे.