

प्रकाश मोहरेकर
वारणानगर : गुलाबी थंडीत... लाल मातीच्या आखाड्यात शड्डूंचा आवाज.... मातीचा सुगंध आणि प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत असताना निर्णायक क्षणी कोल्हापूरचा जागतिक विजेता महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने हरियाणाच्या भारत केसरी रवींद्रकुमारला पोकळ घिस्सा डावावर चितपट करून या मैदानातील मानाचा ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताब पटकाविला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या 31 व्या पुण्यस्मरणानिमित्त राज्यासह देशातील प्रतिष्ठेचे कुस्ती मैदान असा लौकिक मिळविलेल्या वारणानगर येथील ‘विश्वनाथ वारणा शक्ती श्री’ कुस्ती महासंग्रामाचा प्रारंभ वारणा विद्यालयाच्या मैदानावर दुपारी दोन वाजता झाला. मैदानाचे पूजन वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, युवा नेते विश्वेश कोरे, जोतिरादित्य कोरे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन झाले. मैदानात प्रमुख 10 ‘शक्ती श्री’ किताबांसह 40 पुरस्कृत कुस्त्यांसह लहान-मोठ्या 250 कुस्त्या प्रेक्षणीय ठरल्या. या मैदानाचे सर्वेसर्वा वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांचे सायंकाळी सहा वाजता आगमन झाले. त्यांच्या सोबत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने होते.
या मैदानातील मानाच्या प्रथम क्रमांकाच्या ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबासाठी कोल्हापूरचा जागतिक विजेता पृथ्वीराज पाटील विरुद्ध हरियाणाचा हिंदकेसरी रवींद्र कुमार यांच्यात झाली. दोघांची उंची व जोड सारखे असल्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ सुरू होता. मात्र रवींद्र कुमार प्रतिकार करताना मैदानाबाहेर जात होता, तर पृथ्वीराज पाटील दाबत होता. असे वारंवार होत होते. त्याला पंच हणमंत जाधव यांनी समज दिली, तर पृथ्वीराजला आत ओढून खेळायला सांगितले. नंतर मात्र त्यांची जोरदार खडाखडी सुरू झाली. यावेळी मात्र पृथ्वीराजने आक्रमक खेळ करत पंधराव्या मिनिटाला रवींद्र कुमारला पोकळ घिस्सा डावावर चितपट करून या मैदानातील मानाचा ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताब व सन्मानपत्र मिळविले. मैदानाची सूत्रे वारणा तालीम मंडळाचे वस्ताद संदीप पाटील यांनी हाती घेतली होती. विशेष निवेदन प्रा. जीवनकुमार शिंदे तर निवेदक ईश्वरा पाटील व सुरेश जाधव यांनी केले.
उपस्थिती
हिंदकेसरी दीनानाथ सिह, सातारचे पहिले हिंदकेसरी संतोष वेताळ, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, नामदेव मोळे, धनाजी फडतरे, विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील (रेठरेकर), आमदार अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, युवा नेते विश्वेश कोरे, जोतिरादित्य कोरे, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, सर्जेराव पाटील (पेरीडकर).
महाराष्ट्राचे दोन हिंदकेसरीसह 7 हिंदकेसरींची उपस्थिती महाराष्ट्राचे दोन हिंदकेसरी, पंजाब हरियाणा व पंजाबचे 5 हिंदकेसरी, भारत केसरी, 10 उपमहाराष्ट्र केसरी, 15 जागतिक व राष्ट्रीय विजेते आणि डझनभर महाराष्ट्र चॅपियन यांच्या उपस्थिती व सहभागाने नामवंत मैदान झाले.
क्षणचित्रे...
हरियाणाचा राष्ट्रीय विजेता नवीनकुमार यास चितपट केल्यानंतर वारणा तालीम मंडळात एक तप कार्यरत असणारे मल्ल नामदेव केसरे यांनी निवृत्ती जाहीर केली. त्यांचा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राजू आवळे यांचे हलगीवादन लक्षवेधी ठरले. वारणाचे 30 वे मैदान पाहण्यासाठी कुस्तीशौकिनांनी मोठी गर्दी केली होती. खास गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती.
महत्त्वाच्या पुरस्कृत कुस्त्या
सनी मदने (कुंडल) वि. वि. दिग्विजय जाधव (सुपने), रोहित फौजी (रोहतक) वि. वि. शाहरूख खान (पुणे), अभिषेक गुजर (गुडगाव) वि. वि. हनुमंत पुरी (पुणे), भोला यादव ( दिल्ली) वि. वि. अजित पाटील (सावे), नाथा पवार (बेनापूर) वि. वि. पार्थ पाटील (बेळगाव), श्रेयस गाठ (हुपरी) वि. वि. भारत चव्हाण (कोल्हापूर), प्रतीक म्हेतर (राशिवडे) वि. वि. सोहेल शेख (कोल्हापूर), तेजस मोरे (शाहू कुस्ती केंद्र) वि. वि. अजय शेंडगे (शेंडगेवाडी), गौरव हजारे (पुणे) वि. वि. श्रीनाथ गोरे (गंगावेस), अक्षय चौगुले (सांगली) वि. वि. अण्णा यमगर (बेनापूर), अमर पाटील ( बिळाशी) वि. वि. संदीप कुमार (हरियाणा), रोहन रंडे (मुरगूड) वि. वि. विजय वारा (वाशिम), विश्वचरण सोलंकर (गंगावेस) वि.वि. दत्ता खोत (सांगली), पवन मोरे (न्यू मोतीबाग) वि. वि. अतुल काळे (विटा), ओंकार माने (खडूस) वि. वि. कर्तार कांबळे (पेरीड), ओंकार जाधव (चिंचोली) वि. वि. मंगेश माने (पुणे), ऋषिकेश देवकाते (सांगली) वि. वि. रोहित मोढले (पुणे), रामा माने (वारणा) वि. वि. करण गायकवाड (पुणे), शंतनू शिंदे (बेनापूर) वि. वि. अक्षय तांबे (शाहूपुरी), पार्थ कळंत्रे (पुणे) वि. वि. सचिन महागावकर (पेरीड), धुळदेव पांढरे (नातेपुते) वि. वि. सचिन माने (कुंडल), विवेक लाड (येळापूर) वि. वि. कुबेर रजपूत (सांगली), विश्वजित पाटील (वारणा) वि. वि. दिग्विजय देसाई (कोल्हापूर), धीरज पाटील (अंत्री) वि. वि. पुष्पक निपोगणे (पुणे).
अन्य महत्त्वाच्या कुस्त्या
कोल्हापूरचा उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे व हरियाणाचा कुमार भारत केसरी निशांत जाट यांच्यातील लढत अर्धा तास झाली. अखेर 25 मिनिटांनी ही कुस्ती पंच अशोक मोरे यांनी सोडवली व त्यांना समज दिली. त्यानंतर ही कुस्ती पॉईंटवर घेण्याचे ठरले. प्रथम माऊलीला डाव दिला. नंतर निशांतला दिला. कुस्ती बाहेर गेली. पहिल्या मिनिटातच निशांत जाटवर ताबा मिळवत गुण मिळावून दुसर्या क्रमांकाचा माऊली कोकाटेने गुण घेऊन ‘वारणा साखर शक्ती श्री’ किताब पटकविला.
कोल्हापूरचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर व हरियाणाचा भारत केसरी चिराग यांच्यात अत्यंत आक्रमक कुस्ती झाली. पाचव्या मिनिटाला प्रकाश बनकरवर ताबा मिळवत सहाव्या मिनिटाला प्रकाश बनकरला सिंगल निरसन डावावर चिरागने अस्मान दाखवून या मैदानातील तिसर्या क्रमांकाची कुस्ती जिंकत ‘वारणा दूध संघ शक्ती श्री’ किताब पटकविला.
नाशिकचा महाराष्ट्र केसरी हर्षल सादगीर व पंजाबचा जागतिक विजेता इशाक चौधरी यांच्यात 15 मिनिटे लढत झाली. त्यानंतर पंच बटू जाधव यांनी प्रथम हर्षलला 2 मिनिटे डाव दिला, दोघांच्यात पुन्हा खडाखडी सुरू झाली. वेळ संपल्यावर इशाक चौधरीला खाली बसवून डाव दिला आणि अखेर घुटना डावावर हर्षल सादगीरने इशाक चौधरीला अस्मान दाखविले आणि मैदानातील चौथ्या क्रमांकचा ‘वारणा बँक शक्ती श्री’ किताब पटकाविला.
पंजाबचा लुधियाना आखाड्याचा जसप्रीत जखमी झाल्याने सांगलीचा राष्ट्रीय विजेता सुबोध पाटील याला विजयी घोषित करून पाचव्या क्रमांकाचा ‘वारणा दूध-साखर वाहतूक शक्ती श्री’ किताब देण्यात आला.
हरियाणा उत्तर प्रदेश केसरी मलंग ठाकूर याने सातव्या मिनिटाला सांगलीच्या राष्ट्रीय विजेता संदीप मोटे याची हवेत उलटी पुट्टी काढून जाग्यावर पलटी केली आणि ‘वारणा ऊस वाहतूक शक्ती श्री’ किताब पटकाविला.
कोल्हापूरच्या गंगावेसचा महाराष्ट्र चॅम्पियन कालीचरण सोलणकर याने काही मिनिटांतच पंजाबच्या रफी होशियारपूरची झोळी बांधून चितपट केले आणि ‘वारणा बिल ट्यूब शक्ती श्री’चा मानकरी ठरला.
पुण्याचा महाराष्ट्र चॅम्पियन समीर शेख याने राष्ट्रीय विजेता बाळू बोडकेला घिस्सा डावावर पाच मिनिटांत अस्मान दाखवून ‘वारणा शिक्षण शक्ती श्री’ किताब पटकाविला.
हरियाणाचा राष्ट्रीय विजेता मोनूकुमार याला महाराष्ट्र चॅम्पियन श्रीमंत भोसलेने घिस्सा डावावर चितपट केले व ‘वारणा बझार व वारणा महिला शक्ती श्री’ किताब पटकाविला.
हरियाणाच्या राष्ट्रीय विजेता नवीनकुमार याला घिस्सा डावावर चितपट करून वारणाच्या नामदेव केसरे याने या मैदानातील ‘ईडीएफ मान शक्ती श्री’ किताब पटकाविला.