कोल्हापूर : प्रसाद जाधव ‘डे वुईथ कलेक्टर’चा पहिला मानकरी

अवघ्या तीन फूट उंचीच्या दहावीतील विद्यार्थ्याने गिरवले प्रशासकीय कामाचे धडे
Kolhapur News
कोल्हापूर : जिल्हाधिकार्‍यांसमवेत प्रसाद जाधवच्या कामगिरीची कौतुकाने पाहणी करताना मंत्री हसन मुश्रीफ.
Published on
Updated on

कोल्हापूर : दहावीत शिकणारा, पण उंची अवघी तीन फूट एक इंच, तरीही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या खुर्चीशेजारी अंगात ब्लेझर घालून आरामात बसलेल्या प्रसाद जाधवला पाहून जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात येणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांसह नागरिकही अवाक् होत होते. हा मुलगा कोण, तो तिथे का बसलाय, असे अनेक प्रश्न उपस्थितांच्या मनात घोळत होते. प्रसाद मात्र जिल्हाधिकार्‍यांचे प्रत्येक काम निरखून पाहात होता. सकाळी दहा ते सायंकाळी सहा असे आठ तास त्याने प्रशासकीय कामाचे धडे गिरवले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘डे वुईथ कलेक्टर’ हा उपक्रम सोमवारी सुरू केला. त्याचा पहिला मानकरी ठरला नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील श्री पाराशर हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी प्रसाद संजय जाधव. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकांबरोबरच प्रसादने मंत्री मुश्रीफ यांच्याही बैठकीला उपस्थित राहून कामकाजाची माहिती घेतली.

शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय लागावी. ‘जिल्हाधिकारी’ यांच्या करिअर व कार्याची माहिती घेऊन यातून त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्हाधिकारी येडगे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत निवड केलेल्या एका विद्यार्थ्यासोबत दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत. उत्सुक, प्रज्ञावंत आणि विशेष मुलांना जिल्हाधिकार्‍यांसोबत संवाद साधण्याची संधी या उपक्रमाने मिळणार आहे.

प्रसादने गेल्या 3 वर्षात विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला आहे. वक्तृत्व स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार, पर्यवेक्षिका सुरेखा रोकडे, आई-नम—ता व वडील संजय जाधव यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले. विज्ञान प्रदर्शनात यावर्षी त्याचे उपकरण राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले आहे.

प्रसादला उपचारासाठी अमेरिकेलाही पाठवू : मुश्रीफ

वयाच्या मानाने प्रसादची उंची सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. याचा उपचार भारतामध्ये होत नसून परदेशात होत असल्याची माहिती त्याच्या शिक्षिका स्वाती कोकीतकर यांनी दिली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसादला उपचारासाठी परदेशात पाठविण्याबाबत सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

शिक्षकांसाठीही कॉफी वुईथ कलेक्टर...

जिल्ह्यातील शालेय स्तरावरील शिक्षकांसाठी ‘कॉफी विथ कलेक्टर’ हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी दुपारी 2 ते 3 या वेळेत शिक्षकांसोबत जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news