कोल्‍हापूर ; सोन्या-चांदीची पोस्‍ट पार्सल म्‍हणजे..चार आण्याची कोंबडी अन्…

file photo
file photo

हुपरी ; अमजद नदाफ  सोन्या-चांदीची पोस्ट पार्सल म्हणजे चार आण्याची कोंबडी अण बारा आण्याचा मसाला असा काहीसा प्रकार होणार असल्याचे पोस्ट खात्याच्या दर पत्रकातून स्पष्ट होत आहे. त्‍याबाबत उद्योजकांतून नाराजी प्रकट केली जात आहे.

हुपरी परिसरातील चांदी उद्योजकांनी बनविलेले दागिणे देशभरातील सराफ व्यवसायिकांना पोस्ट पार्सल द्वारे पोहच करण्याची सेवा पोस्ट खात्याने सुरू करावी. अशी मागणी काही दिवसांपूर्वी हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशन ने पोस्ट खात्याचे कोल्हापूर विभाग प्रमुख अर्जुन इंगळे यांना समक्ष भेटून केली होती. त्या मागणीला पोस्ट खात्याने नुकतेच लेखी पत्राने उत्तर दिले असून, त्या पत्राप्रमाणे पार्सल पाठवायची झाल्यास कोणत्याही उद्योजकाला खर्च पेलवणारा नाही. हे स्पष्ट होत आहे. एकंदरीत सोन्या-चांदीची पोस्ट पार्सल म्हणजे चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला! अशी परिस्थिती झाली आहे.

पोस्टाने हुपरी चांदी फाऊंडेशनला पाठवलेल्या पत्रात सोन्या-चांदीची पार्सल स्पीड पोस्टाने पाठवल्यास स्वस्त, सुलभ व जलद सेवा मिळेल असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत फाऊंडेशनच्या संचालकांनी हुपरी पोस्ट कार्यालयाशी संपर्क करून स्पीड पोस्ट पार्सल दराची चौकशी केली असता, तेराशे ग्राम चांदीच्या किंवा सतरा ग्राम सोन्याचे दागिणे पाठवण्याचा विमा संरक्षणासह खर्च 7526 रुपये इतका येतो. यामध्ये पोस्टेज खर्च फक्त 440 रूपये तर एक लाख रूपये किंमतीच्या दागिन्याचा विमा 5938 रुपये व वस्तू सेवा कर (GST) 1148 रूपये भरावी लागणार आहे. एवढा खर्च करून पार्सल चार ते पाच दिवसांनी पोहचणार.

एव्हड्या खर्चात एका दिवसात उद्योजक विमानाने जाऊन दागिणे पोहच करु शकतात. अशा प्रकारच्या पोस्टाच्या दर आकारणीने पोस्टाला सोन्याचांदीच्या उद्योजकांना पार्सल सेवा द्यायचीच नाही. हे स्पष्ट होते. याबाबत लोकप्रतिनिधीनी केंद्र सरकारवर दबाव आणून खाजगी पार्सल सेवा देणाऱ्यांच्या तुलनेत माफक दरात पोस्टाने पार्सल सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सोनेचांदी उद्योजकातून मागणी होत आहे.

पूर्वी अशा सेवेद्वारे हुपरी परिसरातील चांदीचे दागिने देशाच्या कानाकोपऱ्यात जात होते. त्यामुळे ते सुरक्षितही होते. कालांतराने ही सेवा बंद झाली. सध्या चांदी माल घेऊन फिरणे असुरक्षित झाले आहे. त्यामुळे पोस्ट खात्याने ही सेवा सुरू करावी अशी मागणी आम्ही केली होती, मात्र त्यांचे दर पाहून घामच फुटला लोकप्रतिनिधींनी केंद्र शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करून दर कमी करून घेण्याची गरज आहे.मोहन मनोहर खोत अध्यक्ष हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news