

कोल्हापूर : जिल्ह्यावरील भार वाढता वाढता वाढेच, असा होत चालला आहे. जिल्ह्यात लोकसंख्या वाढीचा वेग सर्वसाधारण दहा टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे, यामुळे जिल्ह्याची लोकसंख्या 43 लाखांवर जाईल, अशीही शक्यता आहे. लोकसंख्या वाढीमुळे पायाभूत सुविधा आणि सेवांवरचा ताणही वाढणार आहे.
जिल्ह्यात 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार लोकसंख्या 38 लाख 76 हजारांवर होती. पुढील वर्षी जिल्ह्याची लोकसंख्या 43 लाख 50 हजारांवर जाईल, अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यात गेल्या 15 वर्षांत नागरिकरणाचा वेग वाढला आहे. या कालावधीत जिल्ह्यात नव्याने एक महापालिका आणि तीन नगरपालिका, दोन नगरपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. यामुळे नागरी भागाच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे.
7 हजार 685 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या जिल्ह्यात 2011 च्या जनगणनेनुसार घनता प्रती चौरस कि.मी. 504 लोक इतकी होती. 2001 मध्ये ती प्रती चौरस कि.मी. 458 लोक होती. त्यात आणखी वाढ झाली आहे. जिल्ह्यात लोकांची घनता वाढत असून, नव्याने होणार्या जनगणनेत प्रती चौरस कि.मी. 547 लोक यापुढेही जाईल, अशी शक्यता आहे.
लोकसंख्या वाढीचा वेग पाहता, कोल्हापूर शहरासह प्रमुख शहरांच्या हद्दवाढीची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. 1946 पासून कोल्हापूर महापालिकेचे क्षेत्र 66.82 चौ.कि.मी. इतकेच राहिले आहे, त्यावेळी 36 हजारांवर असणारी लोकसंख्या साडेसहा ते सात लाखांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात 2011 च्या जनगणनेनुसार, एकूण लोकसंख्येपैकी 31.73 टक्के लोक जिल्ह्याच्या शहरी भागात राहत होते. यामध्ये आता वाढ होत आहे. जनगणनेनंतरच्या 15 वर्षांत जिल्ह्यात पाच नगरपंचायती वाढल्या आहेत. परिणामी, शहरी भागातील लोकसंख्या वाढीवरही परिणाम झाला आहे. रोजगार, व्यवसाय, नोकरी यासह विविध कारणांनी शहरी भागात वास्तव्य करणार्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे शहरी लोकसंख्येचे प्रमाण जिल्ह्यात 34 टक्क्यांपर्यंत जाईल, अशीही शक्यता आहे. शहरी लोकसंख्या वाढीमुळे शेत जमिनीचे अकृषक क्षेत्रात रुपांतराचे प्रमाण वाढत आहे, शेतीच्या जमिनी रहिवास तसेच औद्योगिक वापरासाठी वापरल्या जात असल्याने जिल्ह्यातील शेतीचे क्षेत्रही कमी होत असून, परिणामी ग्रामीण लोकसंख्येवरही त्याचा काहीसा परिणाम जाणवत आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 3.45 टक्के होती. 2001 च्या जनगणनेत ही संख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 3.64 टक्के होती. हाच वेग जवळपास कायम राहील, अशी शक्यता आहे.
जिल्ह्याची 2025 मधील लोकसंख्या अंदाजे 43 लाख 8 हजारांवर आहे. यामध्ये पुरुष 22 लाख, तर महिलांची लोकसंख्या 21 लाख इतकी आहे.