

कोल्हापूर : अपात्र झालेल्या दूध संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात जाणार आहे. विभागीय निबंधकांच्या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याची माहिती काँग््रेासचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी दिली. महायुतीचा फटका या संस्थांना बसत आहे. महायुतीमुळेच या संस्थांवर अन्याय होत असून भावकीचा वाद आता दूध उत्पादक शेतकऱ्यांवरती आल्याची टीकाही त्यांनी केली.
‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी 5 हजार 470 संस्थेची यादी अंतिम केली होती. यापैकी 1 हजार 320 दूध संस्था अवसायनात असल्याची तक्रार महादेव दूध संस्थेने केली होती. यावर सुनावणी होऊन 427 दूध संस्था अपात्र करण्याचा निर्णय दिला. याबाबत आ. पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत भावकीच्या वादात आता दूध उत्पादकांच्यावरती अन्याय होत असल्याचा आरोप केला. आ. पाटील म्हणाले, महायुतीमुळेच या दूध संस्थांवर अन्याय होत आहे. या संस्थेंतील अनेक संचालकांची भेट झाली आहे. आम्ही सर्वजण एकत्र मिळून अपील करणार आहोत. या सर्व दूध संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील न्यायप्रविष्ठ बाबी पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोकुळ वाचवण्यासाठीचा लढा कायम ठेवणार
पाटील यांनी सभासदांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. भुयेवाडी येथील संजय पाटील यांच्या गायीच्या गोट्याला मंगळवारी त्यांनी भेट दिली. यावेळी गोकुळ दूध संघ हा मल्टिटेस्ट होऊ नये यासाठी आमचा लढा कायम असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दूध संघ राहिला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.