

कोल्हापूर : सध्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमातून गावागावांत परस्परविरोधी पक्षाचे नेते व्यासपीठावर एकत्र येत आहेत. यावेळी होणार्या अनौपचारिक चर्चेतून जागा जागावाटपाच्या गणिताचे चित्र समोर येत आहे. त्यातूनच विरोधकाला टाळून मंडळाच्या कार्यकर्त्यांना आपलं आपलं तयारीला लागा, असा संदेश दिला जात आहे. दरम्यान, महायुतीचे जागावाटपाचे गणित बिघडून महाविकास आघाडीला ताकदीचे उमेदवार मिळू नयेत यासाठी महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र लढून निवडणूक निकालानंतर एकत्र येणार असल्याचे चित्रही स्पष्ट होत आहे.
गणेशोत्सवात नेत्यांच्या भेटीतील जागा मागणीतून होतेय चित्र स्पष्ट
स्वतंत्र लढण्याच्या हालचालीना वेग
गणेशोत्सव संपताच इच्छुकांचे पक्ष ठरणार
आरक्षण जाहीर झाल्यानंतर होणार उमेदवारीची घोषणा
आता आपापसांत लढणार, निकालानंतर महायुती म्हणून येणार एकत्र
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील लोकनियुक्त सदस्यांचा कालावधी 2022 मध्ये संपल्यानंतर तेथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत निवडणूक न झाल्यामुळे दरम्यानच्या काळात इच्छुकांची संख्याही वाढली आहे. त्याचबरोबर पक्षही वाढले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. आता तीन ते चार पक्षांचे सहा प्रमुख पक्ष झाल्याने उमेदवारीची संधीही त्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे.
महायुतीतील भाजप, शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादीत इनकमिंग होत आहे. उमेदवारीच्या अपेक्षेने येणार्यांची संख्या मोठी आहे. पक्षाकडून मोठ्या प्रमाणात सहाय्य मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. सध्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनतेशी संपर्काबरोबरच नेत्यांशीही या इच्छुकांचा संपर्क वाढला आहे. देखावा उद्घाटन ते आरतीच्या माध्यमातून नेत्यांना निमंत्रित केले जात आहे.
अनेक मंडळांतून परस्परविरोधी पक्षाचे तसेच महायुती वा महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते एकत्र येत आहेत. यावेळी व्यासपीठावर होणार्या चर्चेतून कोणता नेता कोणत्या पक्षाच्या माध्यमातून किती जागा लढविण्याची तयारी करत आहे याचीही चर्चा होत आहे. अशाच एका कार्यक्रमात जागा मागणीचा एकमेकांचा अंदाज घेेतच मग तुमचं आमचं जमायचं अवघड दिसतंय इथपर्यंत हा संवाद गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
दरम्यान, आपापसांतील जागावाटपाच्या वादात उमेदवारी नाकारल्याने ताकदीचे उमेदवार महाविकास आघाडीला मिळू नयेत यासाठी महायुतीतील घटकपक्षांनी ताकदीचे उमेदवार घेऊन स्वतंत्रपणे निवडणुकीच्या आखाड्यात उतरावे याबाबत मतदार काय तो कौल देतील. निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी महायुती म्हणून एकत्र यावे, असा एक कौल आहे. सध्या बहुतेक इच्छुकांचे पक्ष जवळजवळ ठरले असून जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.