

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये जागावाटपात शेवटपर्यंत घोळ घालत अनेकांची नाराजी ओढवून घेतली. आत्मदहनाचा इशारा देण्यापर्यंत भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षातील इच्छुकांनी मजल मारली. भाजपचे बोर्ड उतरविण्यापर्यंत इशारे देण्यात आले. वरिष्ठ पातळीवरून ही सगळी प्रकरणे मिटविण्यात तूर्त तरी नेत्यांना यश आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट संपर्कावर भर दिला आहे. तर आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने प्रचारफेर्या सुरू झाल्या आहेत.
भाजपला काहीही करून कोल्हापूरला आपला महापौर करायचा आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच भाजपने पावले टाकली आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी किमान चार महिने अगोदर चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन 34 जागा भाजप लढविणार असल्याचे जाहीर केले. विसर्जित महापालिकेतील भाजपच्या 14 व ताराराणी आघाडीच्या 19 अशा मिळून एक जागा जादा घेत त्यांनी दावा केला. तो करताना आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात लक्ष घातल्याचे सांगिलते.
स्वबळाच्या घोषणेने अनेक इच्छुक गळाला
शिवसेनेचा स्वबळाचा नारा सुरूच होता. शिवसेना व भाजपने राजकीय ताकद वाढविण्यासाठी अनेकांना पक्षात प्रवेश दिले. स्वबळाच्या घोषणेमुळे अनेकांनी आपल्या प्रभागात आपली उमेदवारी नक्की अशी खूणगाठ मनाशी बांधली. मात्र, भाजपची जी पावले पडत होती ती पाहता महायुती होणार हे नक्की होते. तसेच झाले. चर्चेचा व जागावाटपाचा घोळ घालत नाराजी, रूसवे, फुगवे कायम ठेऊन अखेर महायुती आकाराला आली. भाजपला मागणी केलेल्या जागांपेक्षा 2 जादा जागा देत 36 जागा देण्यात आल्या. शिवसेनेला 30 जागा व राष्ट्रवादीला 15 जागा देण्यात आल्या.
उमेदवारी न मिळाल्याने स्वप्नांचा चक्काचूर
महापालिका क्षेत्रात कोल्हापूर उत्तर हा संपूर्ण विधानसभा मतदारसंघ येतो. तर कोल्हापूर दक्षिणमध्ये महापालिकेचे काही प्रभाग आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील दोन्ही आमदार महायुतीचे आहेत. तर विसर्जित महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता होती. महापालिकेत अनेकांना उमेदवारीचे अमिष दाखविण्यात आले. नेत्यांच्या कार्यालयात जागावाटपाच्या कच्च्या याद्या आकाराला आल्या. मात्र प्रत्यक्षात घडले ते वेगळेच. नेते रूसले. कार्यकर्त्यांनी रौद्र रूप धारण केले. अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आणि संताप उफाळून वर आला.
बंडखोरी थांबविली पण नाराजीचे काय?
भाजपसारख्या शिस्तबध्द पक्षात महिला उमेदवाराने केंद्रीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतरही उमेदवारी नाकारल्यानंतर थेट आत्मदहनाचा इशारा दिला. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे बोर्ड उतरविण्याचा इशारा दिला. आता हे नेत्यांना थांबविले असले तरी नाराजी दूर करण्याचे कसब असणार्या नेत्याची गरज आहे. ही नाराजी मतदानापर्यंत दूर करण्याची गरज आहे. जी गोष्ट भाजपची तीच शिवसेनेची तेथे तर जिल्हाप्रमुखांच्या मुलालाच उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनेही बंडखोरीचे हत्यार उपसले. मात्र, त्यांनी अर्ज मागे असला तरी नाराजी दूर करण्याचे आव्हान नेत्यांसमोर कायम आहे. भाजप व शिवसेना नेत्यांसमोर ही नाराजी दूर करून जागा जिंकण्याचे आव्हान आहे.
आघाड्या तयार मात्र जागा किती मिळविणार ?
महाविकास आघाडी म्हणून आकाराला आली नाही. केवळ काँग्रेस व ठाकरे शिवसेनेची ही आघाडी आहे. त्यांच्या नेत्यांनी आता थेट संपर्कावर भर दिला आहे. शरद पवार राष्ट्रवादीला अपेक्षित जागा महाविकास आघाडीत न मिळाल्यामुळे ते बाहेर पडले त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. तर पूर्वी 9 जागा जिंकलेल्या व दोन महापौर केलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला भाजपच्या कोट्यातून जागा द्यायचे ठरले होते. मात्र, त्यांनाही तेथे जागा न मिळाल्याने त्यांनी रिपब्लिकन पक्षाबरोबर आघाडी करून 32 उमेदवार उभे केले आहेत. उमेदवार उभे केले असले तरी याही नेत्यांसमोर जागा जिंकण्याचे आव्हान आहेच.