.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर ः जिल्ह्यात महायुतीला दहाच्या दहा जागांवर यश मिळाल्यामुळे आता विरोधकांनीही आपल्या संस्था वाचविण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांचा रस्ता धरण्याचा विचार सुरू केला आहे; मात्र निवडून आलेल्या महायुतीच्या नव्या शिलेदारांनी विरोधक ज्या पक्षात जाऊ इच्छित आहे तेथे आपला सहकारी पाठवून जागा अडविण्याची आणि विरोधकांना रोखण्याची रणनीती आखली आहे. जिल्ह्यात सध्या हा चर्चेचा विषय आहे.
अनेक ठिकाणी नेत्यांनी उमेदवारी मिळत नसल्याने अन्य पक्षांचा आसरा घेतला. काहींना महाविकास आघाडीतून उमेदवारीही मिळाली; मात्र निवडणुकीत अपयश आल्यामुळे पुढे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभारला आहे. महाविकास आघाडीची अत्यंत तुटपुंजी संख्या आणि नेत्यांकडून पाठबळ मिळण्यात असणार्या अडचणी यांचा विचार करून महायुतीतील अन्य घटक पक्षात जावे का, असा त्यांचा विचार सुरू आहे.
निवडणुकीत ज्या उमेदवाराकडून पराभव झाला त्याचा पक्ष सोडून महायुतीतील उपलब्ध असलेल्या अन्य घटक पक्षात जाण्याबाबत काहींचा विचार सुरू आहे; मात्र याचा सुगावा लागताच निवडून आलेल्या नव्या शिलेदारांनी आपल्या विरोधकांना तेथे स्थान मिळू नये, यासाठी पावले ठाकण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर आपल्या सहकार्यालाच विरोधक जाणार असलेल्या पक्षात पाठवून जागा अडविण्याची आणि विरोधकांना रोखण्याची तयारी केली आहे.
अनेकांच्या संस्था आहेत. तेथे अडचण येऊ शकते. उमेदवारी मिळणार नसल्याने आम्ही नेत्यांना विचारून नाईलाज म्हणून पक्ष बदलला. आता पुन्हा मूळच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक आहोत, असा निरोप पाठविला जाऊ शकतो. सरकारच्या स्थापनेनंतर आणि विधानसभेचे पहिले अधिवेशन पार पडल्यानंतर या हालचाली सुरू होतील. काही चाणाक्ष नेत्यांनी आपल्या विरोधकाला महायुतीच्या घटक पक्षात जागा मिळू नये, याची तयारी केली आहे. त्यासाठी आपलाच निकटवर्ती दोन्ही पक्षांत पाठवून विरोधकांचा प्रवेश बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या हा चर्चेचा विषय आहे.