कोल्हापूर : पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानंतर शहरासह जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकासह प्रमुख चौकाचौकांत पोलिस रस्त्यावर दिसू लागले आहेत. रात्री 11 नंतर शहर, जिल्ह्यातील आस्थापने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक पोलिस यंत्रणेमार्फत आदेशाची कडेकोट अंमलबजावणी होत असल्याने वर्दळ असलेल्या परिसरात रात्री 11 नंतर शुकशुकाट दिसून येत आहे. पोलिस अधीक्षक गुप्ता स्वत: खासगी वाहनातून शहरात पाहणी करीत असल्याने प्रभारी अधिकार्यांसह पोलिसांची मध्यरात्रीपर्यंत गस्त सुरू झाली आहे.
शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौक, भवानी मंडप, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, रेल्वेस्टेशन रोड, न्यू शाहूपुरी, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, टाकाळा, बागल चौक, कावळा नाका, तावडे हॉटेल, सांगली फाटा, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, रेल्वेस्थानक परिसरासह मध्यवर्ती ठिकाणीही सायंकाळनंतर अधिकार्यांसह पोलिसांची वर्दळ दिसू लागली आहे.
काळेधंदेवाल्यांसह मटकाबुकी, जुगारी क्लब, गावठी दारू हातभट्ट्या, कॅसिनोविरुद्ध कठोर कारवाईचे सक्त आदेश पोलिस अधीक्षकांनी पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्यांना दिले आहेत. आदेश देऊनही अवैध व्यावसायिकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अभय देण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकारी, बिट अंमलदारासह गुन्हे प्रगटीकरण पथकाला जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचे त्यांनी निर्देश दिले आहेत.