

Shiye Bhuyewadi Road Illegal Liquor Seized
नागाव: विना परवाना गाडीतून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत सुमारे साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शशांक शामराव कारंडे (वय ३६, रा. गुरुवार पेठ, मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत सोमवारी (दि. २) रात्री पावणेआठच्या सुमारास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिये ते भुयेवाडी रस्त्यावर ‘संजना किराणा स्टोअर्स’समोर पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ (क्र. एमएच ०९ एझेड ५०००) येताना दिसली. संशय आल्याने पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली.
झडतीदरम्यान गाडीत विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. यात विविध ब्रँडच्या एकूण १,८७८ पेक्षा अधिक बाटल्या व टीन असा सुमारे ३ लाख ४५ हजार ९३० रुपयांचा दारूसाठा आढळला. तसेच ५ लाख रुपये किमतीची गाडीही पोलिसांनी जप्त केली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चौरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.