

कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या सराईत गुन्हेगारांसह संघटित टोळ्यांच्या म्होरक्यांवर पोलिसांनी करडी नजर आहे. राजारामपुरी, शाहूपुरीसह चारही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 104 गुंडांची मंगळवारी ओळख परेड घेतली.
कारवाईनंतरही समाजकंटकांचे कारनामे सुरू राहिल्यास संशयितांवर कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर मनपासह जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी संघटित टोळ्यांसह सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आदेश प्रभारी अधिकार्यांना दिले. त्यानुसार जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समाजकंटकांवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहर उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी चारही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची ओळखपरेड घेतली. त्यामध्ये जुना राजवाडा (23), लक्ष्मीपुरी (17), शाहूपुरी (24), राजारामपुरी (40) अशा सराईत गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी निरीक्षक संतोष डोके, संजीव झाडे, श्रीकृष्ण कण्हेरकर, सुशांत चव्हाण उपस्थित होते.