

कोल्हापूर : कानठळ्या बसविणार्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाच्या 737 सायलेन्सरवर शुक्रवारी दसरा चौकात रोडरोलर फिरला. अवघ्या काही मिनिटांत सायलेन्सरचा चक्काचूर झाला. वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे करवीरवासीयांनी मुक्तकंठाने कौतुक केले. नियमांचे उल्लंघन करणार्या सायलेन्सर विक्रेत्यांविरुद्धही पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी उपस्थितांमधून होत होती.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह पथकाने काही दिवसांत 1 हजार 233 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 701 वाहनांचे सायलेन्सर जप्त केले होते. इचलकरंजी वाहतूक शाखेनेही 36 वाहनांचे सायलेन्सर जप्त केलेे. रात्री-अपरात्री शहरात मध्यवर्ती चौक, हॉस्पिटल परिसर, बस, रेल्वेस्थानक, धार्मिक परिसरासह नागरी वस्तीत फटाकेसद़ृश आवाजाने नागरिकांची झोपमोड करणार्या वाहनांचेही सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले होते. या सायलेन्सरवर मध्यवर्ती भरचौकात रोडरोलर फिरविण्याचे निर्देशही पोलिस अधीक्षकांनी दिले होते.
शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दसरा चौकात या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. भरचौकात 400 मीटर अंतर रस्त्यावर एकाचवेळी 737 सायलेन्सर ठेवण्यात आले होते. शेकडो लोकांच्या साक्षीने यावेळी सायलेन्सरवर रोडरोलर फिरविण्यात आला. यावेळी कॉलेज युवक-युवतींचीही तोबा गर्दी झाली होती.
कर्णकर्कश आणि प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणार्या सायलेन्सर विक्रेत्यांचा छडा लावून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रभारी अधिकार्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, असे पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी सांगितले.