

कोल्हापूर : शहरात सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा सराईत गुंडांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन मोपेड, एक कोयता, मिरचीपूड, सात मोबाईल, स्क्रू ड्रायव्हर, दोरी असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सोमवारी रात्री आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात ही कारवाई करण्यात आली.
विजय मोहन पुजारी (वय २०, रा. उचगाव, ता. करवीर), प्रमोद धर्मेंद्र कसबेकर (२०, रा. टेंबलाई नाका), संतोष महादेव मोटे (३१), पृथ्वीराज रवी वावरे (२०), चेतन कोंडिबा लोंढे (२०, तिघेही रा. राजेंद्रनगर), साद शौकतअली मुजावर (२९, रा. यादव कॉलनी) अशी त्यांची नावे आहेत.
आयसोलेशन परिसरात सराईत गुंडांची टोळी सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांना मिळाली होती. यानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकून सहा संशयितांना ताब्यात घेतले. मंगळवारी सकाळी या सहाजणांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रुपेश इंगळे, शाहू तळेकर, विशाल शिरगावकर, दिगंबर कुंभार यांनी ही कारवाई केली.
सहाजणांवर ३० गुन्हे
विजय पुजारीवर मारामारी, लूटमारीसह ७ , प्रमोद कसबेकरवर ३, संतोष मोटेवर ६, पृथ्वीराज वावरेवर ४, साद मुजावर याच्यावर २ व चेतन लोंढेवर २ असे सहाजणांवर एकूण ३० गुन्हे दाखल आहेत.