

आशिष ल. पाटील
गुडाळ : जि.प. चे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यात पी एन पाटील गटात फुट पडल्याने प्रमुख नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी राहुल पाटील मंगळवारी राधानगरीच्या दौऱ्यावर येत आहेत.
दरम्यान, काँग्रेस पक्षातच राहण्याची भूमिका घेऊन आ. सतेज पाटील यांची कोल्हापुरात भेट घेतलेल्या राधानगरीतील कार्यकर्त्यांचे मत परिवर्तन करण्यासाठी शनिवारी पी डी धुंदरे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, बाजार समितीचे माजी चेअरमन भैय्या भुयेकर, संचालक धीरज डोंगळे आदी प्रमुख मंडळींनी राधानगरी तालुक्याचा दौरा केला होता. पण या दौऱ्यात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने स्वतः राहुल पाटील आता राधानगरीच्या मैदानात उतरले आहेत.
तालुक्यातील पी एन पाटील गटाचे हिंदुराव चौगले, रवींद्र पाटील,अभिजीत पाटील या भोगावती साखर कारखान्याच्या तीन संचालकांनी आ. सतेज पाटील यांच्यासोबत राष्ट्रीय काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भोगावतीचे ज्येष्ठ माजी संचालक सहकार भूषण ए डी पाटील, दत्तात्रय पाटील (तारळेकर ) भोगावतीचे माजी चेअरमन संजयसिंह पाटील, माजी जि.प.सदस्य पांडुरंग भांदिगरे, सुशील पाटील (कौलवकर ), लहूसो कुसाळे, छ. राजाराम चे माजी संचालक सुधाकर साळोखे, जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सुप्रियाताई साळोखे, अशोकराव साळोखे, चंद्रकांत चौगले, दिगंबर येरुडकर आदी पी एन गटाच्या प्रमुख मंडळी सह अनेक गावातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्धार केल्याचे सांगण्यात येते.
त्यामुळे यापैकी काही प्रमुख मंडळींचे मत परिवर्तन करण्यासाठी राहुल पाटील यांनी राधानगरी दौऱ्याचे आयोजन केले आहे. आता या दौऱ्यात राहुल पाटील आपल्या गटाचे डॅमेज कंट्रोल किती करणार? याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.