

उजळाईवाडी : अहमदाबाद-कोल्हापूर या स्टार एअरच्या पायलटने दुर्घटनाग्रस्त एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडनच्या पायलटला हॅलो केले. तो हॅलो, अखेरचा ठरला. कोल्हापूरसाठी विमानाने टेकऑफ केले आणि त्यानंतर अवघ्या 13 मिनिटांत त्यांच्याच मागे असलेले लंडनला जाणारे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.
अहमदाबाद विमानतळावरून कोल्हापूरला येण्यासाठी स्टार एअरचे विमान अॅप्रन बे वर थांबले होते. त्याच्याच शेजारी एअर इंडियाचे लंडनला जाणारे हे विमान थांबले होते. कोल्हापूरला विमानाला क्लिअरन्स मिळाला आणि विमान धावपट्टीकडे चालले. त्यावेळी पायलटने एअर इंडियाच्या पायलटला हॅलो केले, त्यांनेही त्यांच्या केबीनमधून हॅलो केले.
दुपारी 1 वाजून 18 मिनिटांनी अहमदाबाद-कोल्हापूर विमानाने विमानतळावरून कोल्हापूरसाठी उड्डाण केले. त्यापाठोपाठ लंडनला जाणारे हे विमान धावपट्टीवर आले. काही वेळाने त्या विमानानेही उड्डाण केले आणि अवघ्या तीन मिनिटांत ते दुर्घटनाग्रस्त झाले. दरम्यान कोल्हापूरसाठी येणारे विमान साडे पाच हजार फुटावर गेले होते, तेथून त्याने वळणही घेतले होते. हे वळण घेतल्यानंतर पायलटला हवेत आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोटही दिसले. काही प्रवाशांनीही ते पाहिले. सुमारे दीड तासांनी कोल्हापुरात विमानाचे लँडींग झाल्यानंतर आपल्या शेजारीच असलेले, विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ज्याला दोन तासापूर्वी हॅलो केले तो पायलट आता नाही, हे विमानतळावरील कर्मचार्यांना सांगताना स्टार एअरच्या पायलटला गहिवरून आले होते.
या अपघातामुळे अहमदाबाद विमानतळावरील सर्व उड्डाणे थांबवण्यात आली होती . सायंकाळनंतर ती सेवा सुरू करण्यात आली . कोल्हापुरातूनही सेवा पूर्ववत सुरू असल्याची माहिती विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.