Teachers Day : झपाटलेल्या शिक्षकाने स्वखर्चातून दुर्गम धनगरवाड्यात उभारली आधुनिक शाळा

शिक्षक पांडुरंग चव्हाण यांच्या ध्यासाची प्रेरणादायी कहाणी
Teachers Day
झपाटलेल्या शिक्षकाने स्वखर्चातून दुर्गम धनगरवाड्यात उभारली आधुनिक शाळा
Published on
Updated on

प्रवीण मस्के

कोल्हापूर : शाळा केवळ चार भिंतींनी उभी राहत नाही, तर शिक्षकांच्या ध्यासाने, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांनी व समाजाच्या विश्वासाने उभी राहते. याचा प्रत्यय देणारा प्रवास शिक्षक पांडुरंग चव्हाण यांच्या कार्यातून पाहायला मिळतो. येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर मात करीत स्वखर्चातून त्यांनी अतिदुर्गम अशा धनवाड्यावर आधुनिक शाळा उभारली आहे.

कुंभारवाडा येथे मित्र शिक्षक विक्रम कुंभार यांच्यासोबत काम करताना ८ विद्यार्थी संख्येची शाळा ४० विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यात त्यांनी योगदान दिले. २०११ मध्ये दत्तनगर येथे आल्यानंतर मराठी शाळेबाबतचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी विविध उपक्रम, शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेचा सराव घेतला. परिणामी, शाळेची पटसंख्या ६१ पर्यंत पोहोचली. बिद्री, मुदाळ तिट्टा आणि परिसरातील मुले रिक्षाने दत्तनगरच्या शाळेत येऊ लागली. हा प्रवास केवळ एका शाळेच्या पटसंख्येचा प्रवास नव्हता, तर मराठी शाळेच्या पुनर्जन्माचा होता.

२०२५ मध्ये बदलीनंतर चव्हाण यांना घरापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम एरंडपे धनगरवाडा येथील शाळा मिळाली. मुख्य रस्त्यापासून अडीच किलोमीटरची पायवाट पार करून ते रोज शाळेत पोहोचतात. सुरुवातीला केवळ सहा विद्यार्थी असलेल्या शाळेच्या विकासासाठी त्यांनी स्वखर्चातून सुमारे दोन लाख रुपये खर्च करून दुरुस्ती, रंगकाम, संरक्षक कुंपण आणि विविध सुविधा उभारल्या. आठ पेट्यांमध्ये बंद असलेल्या शैक्षणिक साहित्याचे रूपांतर सुमारे ५३० उपक्रम असलेल्या ‘शैक्षणिक मॉल’मध्ये केले. आज शाळेची पटसंख्या ११ झाली आहे. मात्र, त्यांच्या कार्याची खरी ओळख केवळ शाळेच्या विकासापुरती मर्यादित नाही. शिक्षकी पेशातील त्यांच्यातील संवेदनशीलता, जिद्द व सामाजिक बांधिलकी इतर शिक्षकांसाठी आदर्शवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news