

चंदगड : पार्ले (ता. चंदगड) येथील शेतकरी खाचू बाळू कांबळे (वय 70) यांच्यावर शनिवारी (दि. 8) दुपारी गावाशेजारी असणाऱ्या जंगलात आपल्या दोन म्हशी घेऊन चारावयास गेला होता. या दरम्यान जंगलातून आलेल्या अस्वलाने थेट त्यांच्यावर हल्ला चढवला.
अस्वलामध्ये झटापट होऊन खाचू कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा एक हात निकामी झाला. सदर माहिती कळताच पाटणे वनपरिक्षेत्राचे कर्मचारी दाखल होऊन खाचू कांबळे यांना चंदगड येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सोमवारी (दि. 10 ) शस्त्रक्रिया करणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
खाचू कांबळे हे आपल्या दोन म्हशीसह गावाशेजारीच असणाऱ्या जंगलात गेले होते. यावेळी हा हल्ला झाला आहे. त्यांच्यावर गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथे वन्य प्राण्यांकडून वारंवार हल्ले होत आहेत. दोन महिन्यापूर्वी गावातील नंदू कांबळे हे जखमी झाले होते. ते सकाळी सात वाजता चंदगडकडे दुचाकी वरून जात असताना गवी रेडा आडवा गेल्याने अपघात होऊन गंभीर जखमी झाले. त्यांच्यावरही अजून उपचार सुरू आहेत.