Drawing Education : ग्रामीण भागात चित्रकला दुर्लक्षितच; शिकवायला शिक्षक नाहीत, मग परीक्षा तरी कशाला?

एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट परीक्षा सुरू असताना अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कलाशिक्षकच उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय
Art
ArtPudhari
Published on: 
Updated on: 
इंद्रजित शिंदे

पन्हाळा : विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होण्यासोबतच त्यांच्या कल्पकतेला व कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने अभ्यासक्रमात चित्रकला विषयाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक सुविधा आणि तज्ज्ञ कलाशिक्षकांचा अभाव असल्याने या विषयाचा मूळ उद्देशच हरवताना दिसत आहे. जिल्हाभरात सध्या शासकीय चित्रकला एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट परीक्षा सुरू असताना अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कलाशिक्षकच उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

पन्हाळा तालुक्याचा विचार करता, सुमारे शंभर माध्यमिक शाळांपैकी अवघ्या पाच ते सहा शाळांमध्येच जी.डी. आर्टचे शिक्षण पूर्ण केलेले तज्ज्ञ कलाशिक्षक कार्यरत आहेत. उर्वरित शाळांमध्ये इतर विषयांचे शिक्षकच कसेबसे चित्रकलेचे धडे देत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण आणि आवश्यक सराव मिळत नसल्याचे चित्र आहे.

चित्रकलेतील कलागुण विकसित करण्याऐवजी बहुतांश विद्यार्थी केवळ दहावीच्या बोर्ड परीक्षेत मिळणाऱ्या तीन, पाच किंवा सात अतिरिक्त गुणांसाठी या परीक्षा देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चित्रकला परीक्षेचा मूळ उद्देश बाजूला पडून ती केवळ गुण मिळविण्याचे साधन ठरत असल्याची खंत पालकांकडून व्यक्त होत आहे.

एलिमेंटरी परीक्षेसाठी १०० रुपये, तर इंटरमीडिएट परीक्षेसाठी २०० रुपये शुल्क भरून विद्यार्थी परीक्षा देतात. मात्र, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध नसतील आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांनाच ऑनलाइन डाउनलोड करावे लागणार असेल, तर शासनाचा भर केवळ शुल्क वसुलीवरच आहे का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. कलाशिक्षकांच्या उपलब्धतेशिवाय राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ कागदोपत्री प्रक्रिया ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

परीक्षा अन् भविष्यातील फायदे

शासकीय चित्रकला परीक्षा उत्तीर्ण झाल्यास दहावीच्या बोर्ड परीक्षेत अतिरिक्त गुण मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांना भविष्यातही त्याचा लाभ होतो. आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, आयटीआय प्रवेशासाठी तसेच एमपीएससी आणि सरळसेवा भरतीतील ‘अनुरेखक’ पदासाठी ही प्रमाणपत्रे उपयुक्त ठरतात.

“प्रत्येक शाळेत स्वतंत्र कलाशिक्षक देणे शक्य नसेल, तर शासनाने किमान केंद्रस्तरावर पाच ते सहा शाळांमागे एक तज्ज्ञ कलाशिक्षक नेमावा. हा शिक्षक आठवड्यातून किमान एक दिवस प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो. तसेच शाळांमध्ये स्वतंत्र ड्रॉइंग रूम, प्रोजेक्टर आणि कला कार्यशाळांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. रखडलेली कलाशिक्षक भरतीही तातडीने पूर्ण करावी.”
संजय चौगले, माजगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news