

Shirol Takwade Meeting
शिरढोण : पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यात बसत आहे. या समस्येतून कायमची मुक्तता हवी असेल तर पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या लढ्याला ग्रामस्थांनी साथ द्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते धनाजी चुडमुंगे यांनी केले. टाकवडे येथे आयोजित जागर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी झुटाळ होते.
चुडमुंगे म्हणाले, “कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्याचे सर्वांनी अनुभवले. इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगांमधून बाहेर पडणारे दूषित पाणी थेट ओढ्यावाटे नदीत सोडले जात आहे. याबाबतचे स्थळ पाहणी अहवाल जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले, तरी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराचे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे.”
३ जूनरोजी कुरुंदवाड येथे होणाऱ्या आंदोलनात टाकवडे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार, खासदार आणि प्रशासन दोन वर्षांत ६०० कोटी रुपयांचा झेडएलडी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रदूषित पाणी नदीत येणार नसल्याचे सांगत आहेत. मात्र, २०१२ मध्ये सीईटीपी प्रकल्पावेळीही अशीच आश्वासने देण्यात आली होती. झेडएलडी प्रकल्पात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असून, हा प्रकल्पही अपयशी ठरेल, असा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला.
सभेत नागेश काळे यांनी स्वागत केले. अनिल हुपरीकर यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.