कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी रात्रीपासून मंगळवार सकाळपर्यंत सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने पंचगंगा नदी तिसर्यांदा पात्राबाहेर पडली. पावसाच्या पुन्हा दमदार बॅटिंगमुळे पंचगंगेची पाणी पातळी अवघ्या 15 तासांत तब्बल साडेसहा फुटांनी वाढली. रात्री साडेआठच्या सुमारास पंचगंगा विहार मंडळाकडून पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर यायला सुरुवात झाली. रात्री 12 वाजता पाणी पातळी 28 फुटांवर गेली होती.
जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, साळवण, आंबा या गावांसह 12 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात सकाळी जोरदार पाऊस झाला. यानंतर दुपारपर्यंत पावसाच्या हलकल्या सरींची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर काहीकाळ पावसाने उघडीप घेतली होती. पुन्हा पावसाची अधून मधून रिपरिप सुरू होती. जिल्ह्यात पावसाचा जोर होता. काही तालुक्यांत धुवाँधार तर काही तालुक्यांत मध्यम सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात धुवाँधार पाऊस सुरू असल्याने घाटमाथ्यावरून खाली येणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. परिणामी नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा आपत्ती विभागाच्या अहवालानुसार पावसामुळे गेल्या 24 तासांत एका खासगी मालमत्तेचे नुकसान झाले. एक राज्यमार्ग व चार जिल्हा मार्गांवर पाणी असल्याने त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
राधानगरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. धरण 87 टक्के भरले असून धरणातून 3100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. याशिवाय चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी हे सात धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून यातून एकूण 13 हजार 636 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर तुळशी 80 टक्के, दूधगंगा 72, कासारी 74, कडवी 96, कुंभी 76, पाटगाव 92, चिकोत्रा 83 टक्के भरले असून आठ प्रकल्पांतून 3 हजार 540 क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरण 83 टक्के भरले असून सायंकाळी चार वाजता वक्र दरवाज्यातून सुरू असलेला विसर्ग वाढवून 8 हजार 530 क्युसेक करण्यात आला.
पंचगंगेची पाणी पातळी सकाळी सात वाजता 21 फुटांवर होती. रात्री 8 वाजेपर्यंत 5 फूट 1 इंचांची वाढ होऊन पाणी पातळी 26 फूट 1 इंचांवर स्थिरावली होती. त्यानंतर तीन तासांतच 1 फूट 10 इंचांनी वाढ होऊन 11 वाजता पातळी 27 फूट 11 इंचांवर पोहोचली होती. यावर्षी पावसाळ्यात पंचगंगा मंगळवारी (1 जुलै) दुसर्यांदा पात्राबाहेर पडली होती. यानंतर 14 दिवसातच पाणी तिसर्यांदा पात्राबाहेर आले. दिवसभरात 18 बंधारे पाण्याखाली गेल्याने एकूण पाण्याखाली गेलेल्या बंधार्यांची संख्या 31 वर पोहोचली आहे. या बंधार्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
राधानगरी, दूधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, धामणी, कोदे या 12 महत्त्वाच्या धरण क्षेत्रांमध्ये गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली.