

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचा अत्यंत निर्घृणपणे खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बेनाडे यांचा अर्धवट जाळलेला आणि दोन तुकड्यांमधील मृतदेह कर्नाटकच्या हद्दीतील संकेश्वरजवळ हिरण्यकेशी नदीत आढळून आला. या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या क्रूर हत्येमागे पुरावा नष्ट करण्याचा आरोपींचा हेतू स्पष्ट दिसत आहे. मारेकऱ्यांनी केवळ बेनाडे यांचा जीवच घेतला नाही, तर ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे दोन तुकडे करून तो जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर नदीच्या प्रवाहात फेकून दिला.
याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, लखन बेनाडे आणि एका महिलेमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, त्यातूनच ही हत्या घडली असावी, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.
या घटनेमुळे रांगोळी गावावर आणि परिसरात शोककळा पसरली असून, एका तरुण लोकप्रतिनिधीच्या अशा निर्घृण हत्येमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलीस तपासात या हत्येमागील नेमके कारण काय आहे आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, हे लवकरच स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.