

कोल्हापूर : शैक्षणिक संस्थेत पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटरहेड, सरपंच व ग्रामसेवकांचे खोटे शिक्के वापरून नागपूरच्या पशू व मत्स विज्ञान विद्यापीठ व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी एकाला अटक केली. निरंजन दिलीप गायकवाड (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. ग्रामसेवक अजित राणे यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली होती.
राणे जुलै 2024 पासून पाचगावमध्ये ग्रामसेवक आहेत. दि. 30 जून 2025 पोपट नारायण कर्जुले यांनी ग्रामपंचयतीकडे गट क्र. 5/5 मधील खाते क्रमांक 23883 ची माहिती मागितली होती. त्यामध्ये शेळी पालन शेड असलेला सत्यप्रत उतारा तसेच ग्रामपंचायतीने दिलेला दाखला खरा की खोटा याची माहिती मिळावी म्हणून अर्ज केला होता. अर्जासोबत जोडलेल्या दाखल्यावर दि. 7 मे 2025 तारीख होती. हा दाखला पाहिला असता ग्रामपंचायतीचे लेटरपॅड, शिक्का, सही आपली नसल्याचे राणे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तसे कर्जुले, रा. तामसवाडी, ता. नेवासा बादुला बहिरोबा, वाटळमिशन, जि. अहिल्यानगर या पत्त्यावर दाखला पाचगाव ग्रा.पं.ने दिला नसल्याचे दि. 4 जुलै 2025 रोजी रितसर कळविले. गायकवाड याने प्रस्तावाला जोडलेला ग्रामपंचायतीचा दाखला कर्जुले यांनी माहिती अधिकारात महाराष्ट्र पशू व मत्स विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्याकडून मिळविला होता. हा बनावट दाखला महालक्ष्मी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था कोल्हापूर अंतर्गत पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावाला संस्थेचा सचिव गायकवाड याने जोडला असल्याचे निदर्शनास आले. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.