Narali Pournima | नृसिंहवाडीत नारळी पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी: कृष्णामाईला नारळ अर्पण करून मनोभावे प्रार्थना
नृसिंहवाडी : नृसिंहवाडीत आज (दि.९) नारळी पौर्णिमेनिमित्त दत्तभक्तांची मांदियाळी भरली होती. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या पाण्यात नारळ अर्पण करून भाविकांनी दत्तपादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.
नारळी पौर्णिमेचा योग सुट्टीच्या दिवशी आल्याने पहाटेपासूनच दत्त मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. प्रातःकालीन काकड आरती झाल्यानंतर षोडशोपचार पूजा, अभिषेक सेवा झाली. दुपारी साडे बारा वाजता श्रींच्या चरणकमलांची महापूजा करण्यात आली. दुपारनंतर ब्रह्मवृंदाकडून पवमान पंचसूक्तांचे पठण करण्यात आले.
दत्त देवस्थानच्या अन्नछत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी धूप-दीप-आरती झाल्यानंतर इंदूकोटी पठण करण्यात आले. अनेक भाविकांनी कृष्णा नदीत नारळ अर्पण करून प्रार्थना केली. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नदीकाठालगत व्हाईट आर्मी व देवस्थानचे कर्मचारी कार्यरत होते. दत्त मंदिरात दर्शन सुलभ होण्यासाठी चार टप्प्यातील रांगा करण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायतीने पार्किंगचे नेटके नियोजन केले होते.
पावसाने उसंत घेतल्याने महापुराचे संकट टळले
जुलै महिन्यात पावसाने उसंत घेतल्याने महापुराचे संकट टळले आहे. दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दरम्यान मंदिर पाण्याखाली असते. मात्र, यंदा नारळी पौर्णिमेच्या दिवशी दर्शनासाठी मंदिर खुले असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. कृष्णामाईने आपले गाऱ्हाणे ऐकून घेतल्याची भावना व्यक्त करत भाविकांनी नदीत नारळ अर्पण केले.

