

Tembe Swami Aradhana Utsav
नृसिंहवाडी : श्री दत्तात्रेयांचे परमभक्त प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचा ११२ वा पुण्यतिथी आराधना उत्सव नृसिंहवाडीत संपन्न झाला. सात दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यतिथी निमित्त श्रींच्या प्रतिमेची फुलांनी सजविलेल्या रथातून ग्रामदिंडी काढण्यात आली. यावेळी प्रदक्षिणा मार्गावर रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा महिलांकडून औक्षण करण्यात आले. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत 'दिगंबरा दिगंबरा..'च्या अखंड जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले होते.
मंदिरात ब्रह्मवृंदाकडून ऋग्वेद संहिता, मन्युसुक्त, श्रीसुक्त, सौरसुक्त यांची आवर्तने संपन्न झाली. यावेळी गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यात आली. दुपारी बारा वाजता श्री टेंबे स्वामी महाराजांच्या पादुकांवर महापूजा करण्यात आली. नैवेद्य व आरती झाल्यानंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी हरी पुजारी यांचे पुराण व शरद घाग यांचे कीर्तन संपन्न झाले.
श्री टेंबे स्वामी महाराजांच्या आराधना उत्सवास नृसिंहवाडीत विशेष महत्व असते. काकड आरती ते शेजारती असे मंदिरातील नित्यक्रम टेंबे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आजही संपन्न होतात. श्री दत्तगुरु व श्री टेंबे स्वामी अशा गुरु शिष्याच्या अनोख्या नात्याचा हा सोहळा असतो.