

कोल्हापूर ः सर्वच राजकीय पक्षांना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ सर करायचा आहे. त्यासाठी जोडण्या लावण्यात येत आहेत. रणनीती आखली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकापेक्षा जास्त इच्छुक असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शह-काटशहाचे राजकारण सुरू असल्याने उमेदवारीसाठी ‘कोल्हापूर उत्तर’ वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. समोरून कोण उमेदवार येणार, त्यावरच पुढचा उमेदवार ठरणार आहे. परिणामी, राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावेच गुलदस्त्यात ठेवल्याने शहरवासीयांत त्याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कोल्हापूर शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात काँग्रेस, शिवसेना, भाजप, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आदींसह इतर पक्षांचा समावेश आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षात कोल्हापूर उत्तर मतदारसंघ घेण्यासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळेही उमेदवार निश्चिती रखडली आहे. मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार, यावर बंडखोरीही अवलंबून आहे. उमेदवारांबरोबरच नेत्यांनाही त्याची चिंता लागली आहे.
सद्यःस्थितीत कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे विद्यमान आमदार जयश्री जाधव दावेदार आहेत. तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारगंधर देशमुख, राजेश लाटकर, आनंद माने, वसंतराव मुळीक यांच्यासह इतरांनी उमेदवारी मागितली आहे. आमदार सतेज पाटील व मधुरिमाराजे यांची नावेही चर्चेत होती. परंतु, आ. पाटील यांनी आम्ही उमेदवारी घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वरीलपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार की सरप्राईज उमेदवार येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटानेही मतदारसंघावर दावा केला आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह इतर इच्छुक आहेत.
कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे महायुतीअंतर्गत हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार आहे. परिणामी, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे प्रबळ दावेदार आहेत; मात्र एप्रिल 2022 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप लढले होते. त्यामुळे भाजपनेही मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपकडून सत्यजित कदम, खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक, राहुल चिकोडे, महेश जाधव, विजय जाधव आदींनी उमेदवारीची मागणी केली आहे. महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीअंतर्गत हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार, त्यावर कोण कोण बंडखोरी करणार, हे ठरणार आहे.