

Nidhori Murgud road closed
मुदाळतिट्टा : सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने राधानगरी - निपाणी मार्गावर निढोरी - मुरगुड दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. मुरगूड येथील सर पिराजी तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने मुरगुड कंरजिवणे, सेनापती कापशी या मार्गावरील वाहतूकही बंद झाली आहे.
भुदरगड तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी निढोरी मुरगूड दरम्यान असणाऱ्या स्मशान शेड जवळ रस्त्यावर आले आहे. अंदाजे दोन फूट इतके पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने येथून होणारी वाहतूक बंद झाली आहे. मुरगूड गंगापूर, मडीलगे, गारगोटी या मार्गावर दिवसभर वाहतूक सुरू होती. पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी वेदगंगा नदीच्या पाणी पत्रात वाढच होत आहे.